मराठी चित्रपटसृष्टीत सध्या इतकं आणि असे बरेच काही चाललय की, त्यातले नेमके काय बरे सांगावे असा प्रश्न पडतो. तरी एक छानसी गोष्ट सांगायला हवीच. काही नवीन जोड्या पाहयचे योग वाढलेत बघा. ‘जरब’ मध्ये अंकुश चौधरी आणि सई लोकूर अशी जोडी जमली. तशी ती ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ मध्येही जमली होती, पण सई त्यात फारच, सोशिक होती. ‘जरब’ करताना अंकुशच्या चांगुलपणाचा सईला बराच अनुभव आला म्हणे.
‘धमक’मध्ये अनिकेत विश्वासराव – गिरीजा जोशी अशी नवी जोडी जमलीय. अनिकेत म्हटलं की पल्लवी सुभाष, पटकन आठवते. पण गिरीजा जोशीशी त्याची जोडी शोभलीय. गिरीजा सांगत होती, चित्रपटात मी ग्लॅमरस रुपात दिसेन.
‘लग्न पहावे करून’मध्ये उमेश कामत आणि मुक्ता बर्वे अशी जोडी दिसेल. मुक्ताचं अभिनयाचे नाणे खणखणीत असल्याने ती कोणाबरोबरही शोभून जाते. उमेश कामत म्हटलं की प्रिया बापट आलीच. ‘लग्न पहावे करून’च्या ध्वनिफित वितरण सोहळ्यात निवेदिकेने सहज गंमत म्हणून मुक्तावरून प्रियाची छेड काढताक्षणीच प्रियाने प्रत्युतर देत शाब्दिक षटकार ठोकला.
नवीन जोडी जमताना शादीशुदा हिरोंना थोडस सांभाळून राहयला हवे असा यावरुन पटकन निष्कर्ष काढू नका. आपण पडद्यावर लक्ष केन्द्रित केलेले बरे. तेच जास्त महत्वाचे असते ना.