मानसी जोशी

दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) बदललेले नियम, इंटरनेटचे घटलेले दर, नवीन आशयाची हाताळणी या गोष्टींमुळे गेल्या वर्षभरात ओटीटी (ओव्हर द टॉप)वर कार्यक्रम पाहण्याचे प्रमाण वाढले. ग्रामीण बाज तसेच प्रादेशिक भाषेतील आशयाचे वाढते वर्चस्व, ‘अ‍ॅपल’, ‘फ्लिपकार्ट’, ‘डिस्ने’ यांची स्पर्धेत उडी यामुळे २०१९ हे वर्ष लक्षात राहिले. प्रयोगशीलतेच्या टप्प्यात असलेली देशातील ओटीटीची बाजारपेठ आता बाळसे धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या वर्षांतील ओटीटी विश्वाचा घेतलेला मागोवा..

मनोरंजन विश्वात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या तीन वर्षांत ‘कण्टेण्ट इज किंग’ या उक्तीने नवीन चित्रपट, वेब सीरिज आणि लघुचित्रपटांची नांदी झालेली पाहायला मिळते. भयपट, विनोदी, रॉम कॉम, अ‍ॅक्शन या प्रकारात नावीन्य आले. आशयासोबतच तांत्रिक गोष्टीत बदल झालेल्या या ओटीटी (ओव्हर द टॉप) विश्वात बरेच बदल पाहायला मिळाले. दूरसंचार कंपन्यांनी इंटरनेटचे कमी केलेले दर, स्वस्तातील स्मार्टफोन या गोष्टीमुळे प्रेक्षकांचा फायदाच झाला. त्याच वेळेस नवीन आशय, सेन्सॉर बोर्डाचे नसलेले नियंत्रण यामुळे अनेक प्रेक्षक ओटीटीवरील कार्यक्रमांकडे आकृष्ट झाले. येत्या वर्षांत ओटीटी विश्वाचे भविष्य उज्ज्वल आहे. जगप्रसिद्ध कंपनी प्राईस वॉटर हाऊस कूपरच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत ओटीटीची बाजारपेठ ११,९७७ करोड रुपयांपर्यंत पोहोचेल. तर केपीएमजी इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०२३ मध्ये दर वर्षांला ५०० लाख प्रेक्षक ओटीटी पाहतील, असा निष्कर्ष आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात ९५ टक्के प्रेक्षक हे मोबाइलवर कार्यक्रम पाहतात. तसेच भारतीय प्रेक्षक रोज सरासरी एक तास ओटीटी प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम पाहतात.

ओटीटी कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्ग हा मेट्रो शहरातील असल्याचा सर्वसाधारण समज आहे. मात्र हा समज खोटा ठरवत ग्रामीण आणि निमशहरी भागातही ओटीटीवर कार्यक्रम पाहण्याचे प्रमाण दोन वर्षांत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. ‘हॉटस्टार’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१८ मध्ये मेट्रो शहरातील ४६ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के लोकांनी ओटीटीवर कार्यक्रम पाहिले. तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील ओटीटीवरील कार्यक्रम पाहणाऱ्यांची संख्या ५४ वरून ६३ टक्के इतकी वाढली आहे. लखनऊ, पुणे आणि पाटणा या शहरांतून सर्वात जास्त मालिका, चित्रपट पाहिले गेले. ‘स्टार इंडिया’चे व्यवसायप्रमुख उदय शंकर यांनी ओटीटीच्या या बदलत्या ट्रेंडकडे लक्ष वेधले. ‘सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची खरी बाजारपेठ ही ग्रामीण आणि निमशहरी भागातच आहे. इंटरनेटचे कमी झालेल्या दरांमुळे ग्रामीण भागात हे कार्यक्रम पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची मानसिकता आणि त्यांचे विषय ओळखून वेब सीरिज, चित्रपट तयार केले जात आहेत. आम्ही केलेल्या पाहणीनुसार देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षक हे मोबाइलवर चित्रपट, गेम्स, वेब सीरिज पाहण्यात जास्त वेळ व्यतीत करत असल्याचे आढळून आले, असे उदय शंकर यांनी सांगितले. त्यांच्या मते ही बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने याप्रमाणे जाहिरात आणि गुंतवणूकदार या क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत.

ओटीटी चॅनेल्सवरील मालिकांवर नजर टाकल्यास ग्रामीण बाज असलेली ‘मिर्झापूर’, ‘रंगबाझ’ या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. गेल्या वर्षी ‘काळे धंदे’, ‘लव्ह सेक्स आणि थिएटर’, ‘मेड इन हेवन’, ‘इनसाइड एज २’, ‘कोटा फॅ क्टरी’, ‘फॅ मिली मॅन’, ‘आऊट ऑफ लव’ आणि ‘दिल्ली क्राईम’ या बेव मालिका सर्वात जास्त पाहिल्या गेल्या. ‘रंगबाझ फिरसे’ या वेब मालिकेचा दिग्दर्शक सचिन पाठक याचे मत काहीसे वेगळे आहे. ‘येत्या दोन-तीन वर्षांत वेबसीरिज आणि वेबफिल्म्समध्ये विविध प्रयोग आणि नवीन विषय हाताळलेले पाहायला मिळतील. ओटीटी चॅनेल्समध्ये सध्या आशय तसेच तांत्रिक बाबीत प्रयोग केले जात आहेत. पुढील वर्षांत उत्कृ ष्ट आशयच राहील. लोकप्रिय वेब सीरिजचे पुढील भाग तयार होतील. काही वर्षांनंतर त्याला निकषांची चाळणी लावण्यात येईल. येत्या काही वर्षांत नवीन ओटीटी प्लॅटफॉम्र्सचाही प्रभाव पाहायला मिळेल,’ असे त्याने सांगितले.

वेब सीरिजचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे ‘वेब चित्रपट’ जास्त येतील असा अंदाजही या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. या वर्षांत दीड ते दोन तासांचे वेब चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाले. ‘वेडिंग गेस्ट’, ‘ड्राईव्ह’, ‘बदनाम गली’, ‘व्हर्जिन भास्कर’, ‘पोशम पा’, ‘छप्पर फाड के’, ‘हाऊस अरेस्ट’ हे वेब चित्रपट नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, झी ५ वर प्रदर्शित झाले. यानिमित्ताने धर्मा, यशराज, एक्सेलसारख्या आघाडीच्या निर्मितीसंस्था वेब चित्रपटांच्या निर्मितीत उतरल्या आहेत. वेगळे विषय आणि नेटके सादरीकरण यामुळे वेब सीरिजप्रमाणे वेब चित्रपटांचाही एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झालेला आहे. यासंदर्भात ‘छप्पर फाड के’ या हॉटस्टार वरील वेब चित्रपटात भूमिका केलेला सिद्धार्थ मेननला म्हणतो, ‘सध्या वेब मालिकेसोबतच अनेक वेब चित्रपटही येत आहे. यामुळे एकाच व्यासपीठावर जगभरातील चित्रपटही पाहण्यास मिळत आहेत. ‘छप्पर फाड के’सुद्धा वेब चित्रपट असून वेगळ्या विषयावर आहे. असेच वेगळे विषय असलेले चित्रपट येत्या वर्षांत प्रदर्शित होतील,’ असेही त्याने सांगितले. सेन्सॉर बोर्डचे नसणारे बंधन यामुळे अनेक चांगले विषयही हाताळले जात आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ न शकलेल्या चित्रपटांनाही यामुळे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

आशयासोबतच विविध ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये त्यांच्या दरावरूनही चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते आहे. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा किमतीत कोण सबस्क्रिप्शन देते यातही चढाओढ सुरू आहे. ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’, ‘वूट’, ‘झी ५’, ‘हॉटस्टार’, ‘जिओ टीव्ही’, ‘अ‍ॅल्ट बालाजी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच ‘अ‍ॅपल’ आणि ‘फ्लिपकार्ट’नेही यात नुक तेच पदार्पण केले आहे. नोव्हेंबरपासून ९९ रुपये प्रतिमाह दराने सेवा देणाऱ्या अ‍ॅपल टीव्हीविषयी प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येते. हा अ‍ॅपल टीव्ही फक्त  अ‍ॅपल वापरकर्त्यांपुरताच मर्यादित असल्याने त्याचा वापर अत्यंत कमी आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत विविध आशयाची वानवा असल्याने अ‍ॅपल टीव्हीचे प्रेक्षकही कमी  आहेत. ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टनेही नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची घोषणा केली. फ्लिपकार्ट सर्वापेक्षा वेगळा आशय काय देईल याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. यापाठोपाठ आता डिस्कव्हरीही ओटीटी विश्वात येण्याचा विचार करत असून यासाठी त्यांनी सायफ्राय वॉलसॅटशी हातमिळवणी केली आहे.

देशात ओटीटी विश्वाबद्दल सकारात्मक चित्र असले तरीही आजही काही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. इंटरनेटचा वेग हा त्यातील कळीचा मुद्दा मानला जातो आहे. परदेशात फायबर नेट आल्यावरही भारतीय प्रेक्षक मात्र फोरजीवरच जगत आहे. प्रवासात अथवा लोकलमध्ये आपले आवडते कार्यक्रम पाहताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रेक्षकांना कार्यक्रम ऑफलाइन पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे देशात तंत्रज्ञानात सुधारणा प्रेक्षकांना अपेक्षित आहे.

पर्यटन संस्थांशीही हातमिळवणी

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मनी दूरसंचार कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. एअरटेल, व्होडाफोन यांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राईम, झी ५, आणि नेटफ्लिक्स सारखे अ‍ॅप काही महिने मोफत वापरता येतात. तसेच निवडक टीव्ही कंपनी, मोबाइल यांना यूटय़ूब प्रीमियम सवलतीमध्ये देण्यात येत आहे. आतापर्यंत सोनी लाइव्हने ‘इंडिगो एअरलाइनशी’, झी ५ ने ‘जलेश क्रूझशी’, इरॉसने ‘एअर आशिया’ आणि ब्रिटिश एअरवेज, तसेच नेटफ्लिक्सने ‘व्हर्जिनशी’ सहकार्याचा करार केला आहे. यामुळे प्रेक्षकांची चैन झाली असून वरील विमान सेवांसोबत प्रवास केल्यास त्यांना प्रवासातही ओटीटी कार्यक्रम पाहता येणार आहेत.

वर्षभरात काय पाहाल ?

नेटफ्लिक्स

*  ‘घोस्ट स्टोरीज’ – ‘लस्ट स्टोरीज’ला मिळालेल्या यशानंतर करण जोहर, झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘घोस्ट स्टोरीज’ प्रदर्शित झाला आहे.

* ‘जामताडा सबका नंबर आएगा’ – सत्य घटनेवरील आधारित झारखंडमधील जामताडा गावात घडणारी कथा नक्कीच पाहण्यासारखी आहे. ही वेब मालिका १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

* ‘बाहुबली – बिफोर द बिगिनिंग’ – आनंद नीलकंठ यांच्या ‘द राईझ ऑफ शिवगामी’ या कादंबरीवर आधारित बाहुबली मालिकेची पुढील आवृत्ती येणार आहे. यात राणी शिवगामीचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे.

* ‘वीर दास फॉर इंडिया’ – नेटफिलक्ससोबत स्टॅण्डअप कॉमेडीचे दोन कार्यक्रम लोकप्रिय झाल्यानंतर वीर दास तिसरा कार्यक्रम घेऊन येत असून याचा एक विशिष्ट चाहतावर्ग गेल्या काही वर्षांत तयार झाला आहे.

* ‘सेक्स एज्युकेशन’ – दुसरा भाग

अ‍ॅमेझॉन प्राईम

* ‘द फॉरगॉटन आर्मी’ – सनी कौशल आणि शरवीर वाघ यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा मांडणार आहे. दिग्दर्शक कबीर खान ही वेब मालिका दिग्दर्शित करत आहे.

* ‘ब्रेथ २’ – आपल्या वेगळ्या धाटणीने प्रसिद्ध झालेली आर. माधवनच्या ‘ब्रेथ’ या वेब मालिकेचा दुसरा भाग या वर्षांत पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या भागात अभिनेता अभिषेक बच्चन यातून वेब विश्वात पदार्पण करत आहे.

*  ‘मिर्झापूर २’ –  मिर्झापूर मालिकेचा दुसरा भाग येत असून हाणामारी, खूनखराबा आणि सेक्स यापेक्षा वेगळे काय असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

झी ५

* ‘नेव्हर किस युवर बेस्ट फ्रेंड’ – रॉम कॉम प्रकारात मोडणाऱ्या या वेब मालिकेत नकुल सिंह आणि अन्या सिंग दिसणार आहेत.

* ‘स्टेट ऑफ सीज’ – मुंबईतील २६-११च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ही मालिका २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. संदीप उन्नीथनच्या ‘ब्लॅक टॉर्नेडो’ या पुस्तकावर आधारित वेब सीरिजचे  दिग्दर्शन मॅथ्यू ल्यूईवॉटरने केले आहे.

* ‘कोड एम’ – जेनिफर विंगेट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.

* ‘दिल ही तो हे’ तिसरा भाग – एकता कपूरच्या पारंपरिक ‘क’च्या बाजात मोडणाऱ्या मालिकेत तीच प्रेमकथा, रडारडी, एक खुनशी खलनायिका पाहण्यास मिळेल.

* ‘इट हॅपन्स इन कोलकत्ता’ प्रमुख भूमिका – निगमा रिझवान, करन कुंद्रा

* ‘मेंटलहूड’ – प्रमुख कलाकार दिनो मोरिया, संजय सुरी. या वेबसीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री करिश्मा कपूरही वेब विश्वात पदार्पण करणार आहे.