19 December 2018

News Flash

‘इनसिडियस ४’ चे पोस्टर पाहून तुम्हीही घाबराल…

सिनेमाचा ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो

जगभरात भयपट पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ‘अॅनाबेल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई केल्यानंतर आता अजून एक भयपट तुम्हाला घाबरवायला सज्ज झाला आहे. ‘इनसिडियसः द लास्ट की’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. याआधी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्शने सोशल मीडियावर या सिनेमांचे नवीन पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत.

सिनेमाचे पोस्टर फारच घाबरवणारे आहेत. या पोस्टरमध्ये हाताला चावीचे (की) स्वरुप देण्यात आले आहे. ही चावी कोणाचा तरी जीव घेणार असेच या पोस्टरमध्ये दिसते. पोस्टरमधील दृश्य पाहून हे सिनेमातील एखादे दृश्य असल्याचे जाणवते. हे पोस्टर प्रदर्शित करताना आदर्श यांनी लिहिले की, ‘इनसिडियस- द लास्ट की’ सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. हा सिनेमा पुढच्या वर्षी ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

निर्माता जेम्स वॅन ‘इनसिडियस’ सीरीजचा चौथा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अॅडम रॉबिटलने केले असून, सिनेमाचा ट्रेलर सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर पाहून अनेकांच्या अंगावर काटे आले नसतील तर नवल…

या सिनेमात लिन शाय ही डॉ. अॅलिस रेनियरची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. ती स्वतः पॅरासायकोलॉजिस्ट असते. आतापर्यंत दुसऱ्यांसाठी वाईट शक्तींशी लढणाऱ्या अॅलिसने स्वतःचे घर वाचवण्यासाठी दिलेला लढा या सिनेमातून पाहता येणार आहे. जेम्स वॅन यांनी याआधी कॉनज्युरिंग आणि इनसिडियस या दोन्ही सिनेमांचे दोन भाग दिग्दर्शित केले आहेत.

दरम्यान, हॉलिवूडचा भयपट ‘इट’ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या कलेक्शनचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. या सिनेमाने अमेरिकेत अवघ्या तीन दिवसांत सुमारे ११.७२ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व भयपटांचा रेकॉर्ड या सिनेमाने मोडला आहेत. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भयपटांमध्ये ‘इट’ हा अव्वल ठरला आहे. आता ‘इट’ सिनेमाचा रेकॉर्ड ‘इनसिडियसः द लास्ट की’ मोडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

First Published on November 14, 2017 6:10 pm

Web Title: new poster of hollywood horror movie insidious the last key released