दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं.मात्र, यंदाच्या दिवाळीत करोनाचं सावट आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर सगळ्याचा भर असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे यंदा दिवाळी साध्या पद्धतीत असली तरीदेखील प्रत्येक व्यक्तीमधील उत्साह कायम असल्याचं दिसून येतं. त्यातच ही दिवाळी खास करण्यासाठी आशेची रोषणाई हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे या लघुपटात अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया एकत्र झळकले आहेत.

‘पुनीत बालन स्टुडिओज’निर्मित आशेची रोषणाई या लघुपटातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. महेश लिमये यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं असून अजय-अतुल या जोडीने संगीत दिलं आहे. त्यासोबतच बऱ्याच काळानंतर रितेश आणि जेनेलिया या लघुपटाच्या निमित्ताने एकत्र झळकले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यामुळे आशेची रोषणाई हा लघुपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे.

“सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लॉकडाउनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे. त्या घटकांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पसरवूया अशी संकल्पना निर्माते पुनीत बालन यांनी मांडली, यातून ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्मची निर्मिती झाली. या शॉर्टफिल्मची संकल्पना ऐकता क्षणी अभिनेता रितेश देशमुख आणि संगीतकार अजय – अतुल यांनी होकार दिला. बालन यांची संकल्पना लेखक क्षितिज पटवर्धन याने त्याच्या लेखणीतून उत्तम उतरवली आहे. संगीतकार अजय – अतुल यांनी अतिशय कमी वेळेत पार्श्वसंगीताचा साज ‘आशेची रोषणाई’ला चढवला आहे तर रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी चार चाँद लावले आहेत,” असं महेश लिमये म्हणाले.

दरम्यान, या लघुपटाला ज्येष्ठ अभिनेत्री निना कुळकर्णी यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘आशेची रोषणाई’चे क्रिएटिव्ह हेड विनोद सातव आहेत, तर कार्यकारी निर्माते म्हणून अश्विनी तेरणीकर, कुशल कोंडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्टफिल्म ‘पुनीत बालन स्टुडिओज’च्या युट्यूब चॅनल, फेसबुक, इनस्टाग्राम पेजवर विनामूल्य उपलब्ध आहे.