‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं…’ ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये लोकप्रिय आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे ‘गॅटमॅट’ देखील जुळवून दिले आहे. अशाच प्रेमाचं गोड समीकरण उलगडणाऱ्या ‘गॅटमॅट’ या चित्रपटातील एक नवंकोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

गॅटमॅटमधील ‘एक पेग दोन पग’ हे गाणं प्रदर्शित झालं असून प्रसिद्ध रॅपर बाबा सेहगलने हे गाणं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याने तरुणाईला अक्षरश: वेड लावल्याचं दिसून येत आहे. हे गाणं अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.

अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडत असलेल्या या ड्युएट गाण्यामध्ये जुईली जोगळेकरने बाबा सेहगलला साथ दिली आहे. कॉलेजपार्टीवर आधारित असलेलं हे गाणं सचिन पाठक यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक समीर साप्तीस्करचे संगीत या गाण्याला लाभलं आहे.

अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं  दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केलं आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव निर्माते आहेत. कॉलेज विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा हा चित्रपट, मनोरंजनाचे प्रेक्षकांसोबत ‘गॅटमॅट’ जुळवण्यास येत आहे.