प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी प्रख्यात कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत, म्हणूनही या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाचे तिसरे गाणे “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….” प्रदर्शित झाले आहे. हे गाणे डॉ सलील कुलकर्णी यांचे पुत्र शुभंकर यांनी गायले आहे, हे त्याचे वैशिष्ट्य.

पक्या शहाणे हा परी प्रधानला मागणी घालतो आणि त्यांचे लग्न ठरते. या लग्नाची लगबग सुरु होते. “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं…कुणी जेवाल्यावाचून नाही जायचं हं….माझ्या मामाच्या लग्नाची गेली बातमी वाऱ्याला…”हे गाण्याचे बोल आहेत. १४ वर्षीय शुभंकर सलील कुलकर्णी याने हे गाणे गायले आहे. त्याने वयाच्या केवळ सातव्या वर्षी ‘चिंटू’ या मराठी चित्रपटात पहिले गाणे गायले होते. ‘वेडिंगचा शिनेमा’मधील या गाण्यात त्याला आर्या आंबेकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी साथ दिली आहे. प्रसेनजीत हा जेव्हा ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये सहभागी झाला होता त्यावेळी डॉ सलील कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी प्रसेनजीतला त्यावेळी स्वतंत्र गाणे गाण्याची संधी देण्याचा शब्द दिला होता, तो या माध्यमातून पूर्ण केला आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.