राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट येत्या २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. संजूच्या ट्रेलर,टीझरला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तो प्रदर्शनापूर्वीच तो लोकप्रिय झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील रणबीरचा लूक पाहता प्रत्यक्षात संजयलाच पाहत असल्याचा भास होतांना दिसतो. आतापर्यंत या चित्रपटामध्ये झळकणा-या प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. मात्र करिश्मा तन्ना एकाही पोस्टरमध्ये झळकली नव्हती.

संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’मध्ये त्याच्या जीवनातील काही महत्वाचे क्षण चित्रीत करण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटामध्ये त्याच्या जवळच्या व्यक्तींची भूमिका कोण साकारणार हे निश्चित झाले आहे. मात्र संजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका कोण साकारणार या नावाचा खुलासा झालेला नाही. सध्या या भूमिकेसाठी करिश्मा तन्नाच्या नावाचा विचार करण्यात येत असून नुकतच एक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये पहिल्यांदाच करिश्मा तन्ना झळकली असून ती माधुरी दिक्षितप्रमाणे दिसून येत आहे.

संजू पोस्टर

‘संजू’मध्ये नर्गिसची भूमिका मनिषा कोईराला करणार असून त्याच्या बहिणीची भूमिका अदिती गौतम साकारणार असल्याचं पाहायला मिळत आहे. तर संजूच्या चांगल्या वाईट काळात खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या कुमार गौरव यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये करिश्माने काळ्या रंगाचा चष्मा घातला असून यात ती हुबेहुब माधुरीप्रमाणे भासत आहे. त्यामुळे ‘संजूम’ध्ये ती माधुरीचीच भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टरमध्ये तिच्या व्यतिरिक्त रणबीर कपूर आणि विक्की कौशल देखील दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये करिश्माने तिच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती. चित्रपटामध्ये तिची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे.मात्र ती कोणत्या व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार हे तिने स्पष्ट केले नव्हते.