गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर अभिषेक बच्चनची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा अभिनेता लवकरच ‘breathe in to the shadows’ या वेबसीरिजच्या माध्यमातून वेब विश्वात पदार्पण करत आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अॅमेझॉन प्राइमवर ‘breathe in to the shadows’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील अभिषेकचा लूक प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या सीरिजविषयी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्यातच अलिकडे प्रदर्शित झालेला टीझर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

या टीझरमधून अभिनेत्री निथ्या मेनन हिचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “सगळं काही सुरुळीत सुरु होतं..पण अचानक एकदिवस सगळं काही बदलून गेलं. तुम्हाला माहित आहे का आमची सिया कुठे आहे”?, असं कॅप्शन अभिषेकने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.