नाटककार सुरेश जयराम हे फार्ससाठी सुपरिचित आहेत. अलीकडेच त्यांचा ‘कधी घरी, कधी शेजारी’ हा नवा फार्स रंगमंचावर आला आहे. आपल्याकडे फार्सचा एक साचा ठरून गेला आहे. नवरा अथवा बायकोचं विवाहबाह्य़ लफडं, किंवा ते तसं असल्याचा कुणा एकाचा झालेला गैरसमज आणि त्या संशयास बळकटी येईल अशा घटना-प्रसंगांची मालिका त्यानंतर कर्मधर्मसंयोगानं गुंफली गेल्यानं तो अधिकच बळावणं, त्यात मग आणखी काही निरपराध, निष्पाप पात्रांची नकळत होणारी गुंतणूक (इन्व्हॉल्व्हमेंट).. संशयाच्या केन्द्रस्थानी असलेल्या व्यक्तीनं या संशयाच्या जाळ्यातून सुटकेसाठी केलेल्या नानाविध उचापतींमुळे ती आणखीन गाळात रुतत जाणं.. आणि शेवटी हा संशय मिटावा अशी सिच्युएशन निर्माण होऊन गैरसमजाचं निराकरण होणं.. किंवा संदिग्ध शेवटाने पुढच्या फार्सिकल कॉमेडीचं बीज हवेत पेरून नाटकाची सांगता होणं.. असा साधारण मालमसाला फार्समध्ये असतो. ‘कधी घरी, कधी शेजारी’मध्येही हाच मसाला आहे. यातला शेखर हा लफंडू गृहस्थ आपल्या बायकोला मित्रांकरवी थापा मारून डान्स बारमध्ये रात्री ऐश करायला जातो. परंतु त्याच्या दुर्दैवानं त्यानं ज्या ज्या मित्रांना आपल्या वेळेत घरी न पोहोचण्याबद्दल बायकोला (स्वप्नाली) कळवायला सांगितलेलं असतं, त्या सर्वानी एकाच वेळी शेखर आपल्या सोबत आपल्या घरी झोपला असल्याचं स्वप्नालीला कळवल्यानं स्वाभाविकच तिचा संशय जागा होतो. अर्थात शेखर या हातावरची थुंकी त्या हातावर करण्यात माहीर असल्यानं तो आपण हॅरीच्या- आपल्या शेजारच्या मित्राच्या घरी होतो असं बिनधास्त ठोकून देतो. हॅरीला याची काहीच कल्पना नसल्यानं तो मधल्या मधे लटकतो. त्याला स्वप्नालीशी खोटंही बोलता येत नाही आणि मित्राला वाचवण्याकरता शेखरची धड पाठराखणही करता येत नाही. उलट, शेखर हॅरीलाच तोंडघशी पाडून स्वप्नालीच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेतो. परंतु या गडबडीत डान्स बारवर पडलेल्या पोलिसांच्या धाडीत बारबाला चांदणीनं तिचा पाच लाखांचा हिऱ्यांचा हार सुरक्षित राहावा म्हणून शेखरच्या खिशात टाकलेला असतो, तो स्वप्नालीला सापडतो. शेखर तो हार आपण तुझ्यासाठीच खरेदी केल्याचं स्वप्नालीला सांगतो. तो हार पाहून ती हरखते. नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे असं तिला वाटतं.
परंतु चांदणी तो हार परत घ्यायला त्याच्या घरी येते तेव्हा त्याची पंचाईत होते. तो हार आपल्याला बारचा मालक शेट्टी यानं दिलेला आहे आणि तो परत केला नाहीस तर शेट्टी तुझा गेम करायला मागेपुढे पाहणार नाही, असं चांदणी त्याला धमकावते. त्यामुळे शेखरची पाचावर धारण बसते. आता स्वप्नालीकडून तो हार परत मिळवून चांदणीला कसा द्यायचा, या विवंचनेत असतानाच शेखरला पंधरा दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईला कुबेर ट्रॅव्हल कंपनीच्या बसने येताना झालेल्या अपघातातील जखमींना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळत असल्याचं वर्तमान कळतं. आपणही भरपाईचा दावा करून कुबेर कंपनीकडून पाच लाख रुपये उकळावेत आणि त्यातून चांदणीचा हार परत करावा, अशी एक अफलातून आयडिया त्याला सुचते. तो कुबेर कंपनीला फोन करून नुकसानभरपाईची मागणी करतो. पण कंपनीचे सव्र्हे इन्स्पेक्टर आणि डॉक्टर घरी येऊन शेखरच्या दाव्यातील खरे-खोटेपणा तपासल्यावरच त्याच्या दाव्यावर निर्णय घेतील असं त्याला कळवलं जातं. पाच लाख रुपये मिळवण्यासाठी शेखर हॅरीच्या मदतीनं नाना उचापत्या करतो. परंतु त्यातून तो आणखीनच गाळात रुतत जातो. शेवटी तो आणि हॅरी या झमेल्यातून कसे बाहेर पडतात, आणि त्यादरम्यान काय काय घडतं, याचा ‘ऑंखों देखा हाल’ प्रत्यक्ष प्रयोगातच पाहणं उचित.
अतक्र्य घटना-प्रसंगांची मालिका आणि त्यातून कथानकात वाढत जाणारी गुंतवळ, विविध पात्रांच्या स्वभाव व लकबींपायी निर्माण होणारे हास्यस्फोटक प्रसंग, प्रेक्षकांना डोकं चालवायला जराही उसंत न देता सतत नाटय़पूर्ण प्रसंगांचा भडीमार त्यांच्यावर करणं.. असं सगळंच या फार्समध्ये मौजूद आहे. लेखक सुरेश जयराम यांची हुकमी फार्सिकल लेखणी हे सारं सफाईनं उभं करते. परंतु त्यात नवं असं काहीच नाही, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. त्यातही फार्सची वरकरणी विसविशीत भासणारी, परंतु आतून लवचिक अशी वीण यात दिसत नाही. समोर घडणारं ‘नाटक’ आहे, हे प्रेक्षक विसरत नाहीत. तसा विसर पाडण्याची क्षमता ‘कधी घरी, कधी शेजारी’मध्ये नाही. दिग्दर्शक मंदार शिंदे यांचं कच्चं दिग्दर्शन कलाकारांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी झाकत नाही. फार्समधल्या फसवाफसवीच्या खेळात प्रेक्षक स्वखुशीनं सामील होणं, ही फार्सच्या यशस्वीतेची पावती असते. ते या नाटकात होत नाही. कलाकारांनी आपल्या परीनं निकराचे प्रयत्न करूनही घटना-प्रसंगांचे सुटे सुटे तुकडेच प्रेक्षकांना काही अंशी रिझवू शकतात. मात्र, एक संपूर्ण मनोरंजक नाटय़ानुभव त्यांच्या पदरी पडत नाही.
प्रदीप पाटील यांनी शेखरचं घर आणि त्याच्या घरातून हॅरीच्या घरात जाता येण्यासाठी उपयुक्त बाल्कनीसहची इमारत  यथातथ्य साकारली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजनाही नाटकाची मागणी पुरवणारी आहे.
मौसमी तोंडवळकर यांनी यातली चटकचांदणी मादक बारबाला ठसक्यात वठविली आहे. पण त्यांच्या तोंडची मालवणी बोली मात्र सदोष आहे. भूषण घाडींनी शेखरच्या उचापती अतिशय कष्टपूर्वक, परंतु मन:पूत दाखवल्या आहेत. त्यांना साथ करणाऱ्या अनिल शिंदे (हॅरी केसकर) यांनी मात्र धमाल आणली आहे. शेखरच्या थापा पचविण्यासाठी त्यांना जे भयंकर भोग भोगावे लागले आहेत, ते पाहून बिचाऱ्यांची दया येते.
विशाल तावडेंनी मानहलव्या डॉ्रक्टर छान साकारला आहे. प्रियांका जगताप यांची चमेलीची स्वल्प भूमिकाही लक्षवेधी. तेजस्वी पाटील (स्वप्नाली), चंद्रकांत मोरे (इन्स्पेक्टर), राधिका सुवर्णपाटकी (मावशी) यांनीही सुयोग्य साथ केली आहे. कलाकारांच्या प्रयत्नांना दिग्दर्शकीय जोड मिळती तर हा फार्स आणखी मनोरंजक झाला असता.