गुढी नव्या संकल्पांची, नव्या विचारांची.. नव्या वर्षांची सुरुवात नव्या गोष्टींनी झाली तर गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा होतो. गेली काही वर्ष सतत पुढेच पाऊल टाकणारी मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी कलाकार यांच्यासाठी हा गुढीपाडवा खास ठरला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री उषा जाधव असो नाहीतर दिग्दर्शनाची सूत्रे हातात घेणारी मृणाल कुलकर्णी असो.. हा पाडवा कोणकोणत्या कलाकारांसाठी नव्या विचारांची, संकल्पांची गुढी घेऊन आला आहे..

नवे वर्ष नवी भूमिका – मृणाल कुलकर्णी
हा गुढीपाडवा माझ्यासाठी विशेष आहे. कारण नवीन वर्षांचे स्वागत करताना नवीन भूमिकेतील मला प्रेक्षक स्वीकारणार की नाही, याची उत्सुकता लागून राहिली आहे. इतकी वर्षे अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळे काहीतरी करावे ही इच्छा होती. योगायोगाने पुढच्याच आठवडय़ात मी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या नव्या भूमिकेत प्रेक्षक मला किती पसंत करतात, हीच उत्सुकता सध्या  आहे. घरात तर एखाद्या करिअरिस्ट स्त्रीसारखी माझी धावपळ सुरू आहे. एकीकडे चित्रपटाच्या प्रमोशनची गडबडीत मी गुंतले आहे. दुसरीकडे मुलाची परीक्षा आहे आणि तरीही एको वेगळ्या आनंदात मी आहे. हा आठवडा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. माझ्या घरी तर गुढी उभारली जाणार आहेच; पण यानिमित्ताने मी पहिल्यांदाच डोंबिवलीतील शोभायात्रेत सामील होणार आहे.

गुढीपाडवा – मनात घर करून राहिलेला – संध्या गोखले
काही क्षण, काही काही दिवस लहानपणापासून मनात घर करून असतात. माझ्यासाठी गुढीपाडवा असाच आहे. या दिवशी जाणीवपूर्वक आपण काहीतरी नवीन करायला हवे असे वाटत राहते. या गुढीपाडव्याला एरव्ही पटकथा लेखक म्हणून पडद्यामागे धावपळ करणारी मी पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे उभी राहिले. ‘वी आर ऑन..होऊन जाऊ द्या’ हा विनोदी चित्रपट मी आणि अमोल पालेकर प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. माझ्यादृष्टीने म्हणूनच हा गुढीपाडवा खास आहे.

आनंद द्विगुणीत -उषा जाधव
अभिनय कारकीर्दीतील सोनेरी क्षण म्हणजे कारकीर्दीच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटविणे. ‘धग’ सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी मला यंदा सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झाले आणि आमच्या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक जाहीर झाले ही आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट घडली. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याला आनंद द्विगुणित झाला आहे. यशाची गुढी उभारली अशी भावना मनात जागी झाली आहे. म्हणूनच यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. गेल्या पाच-सात वर्षांपासून घरापासून दूर राहिल्यामुळे गुढीपाडव्याला घरी जाणेच झालेले नाही. म्हणूनच यंदाचा माझा ‘स्पेशल’ गुढीपाडवा कोल्हापूरला माझ्या घरी आई-बाबा आणि लहानपणापासूनचे सगळे मित्रमैत्रिणी, कॉलनीतील शेजारी यांच्यासमवेत साजरी करण्याचे ठरविले. यशाची गुढी उभारली, आनंदाचा ठेवा मला प्रियजनांसोबत साजरा करण्याची मजा काही औरच असते.

विशेष आनंदाचा – अभिजीत सावंत
फरीदा हा तिसरा सोलो अल्बम नुकताच प्रकाशित झाल्याने यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे. रिअ‍ॅलिटी शोमधील पहिला आयडॉल बनल्यानंतरच्या काळात पाश्र्वगायन, अभिनय या क्षेत्रात प्रयत्न केले. परंतु त्याचबरोबरीने स्टेज शो आणि दोन अल्बमही केले. ‘आपका अभिजीत’ या अल्बमला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला. त्यामुळे फरीदा प्रकाशित झाल्याचा आनंद मोठा आहे. खासकरून या अल्बमसाठी दोन वर्षांपासून खूप मेहनत घेतली आहे. पंजाबी लोकगीताच्या बाजाच्या गाण्यापासून ते सुफी संगीतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी या अल्बममध्ये असून ती रसिकांना आवडतील अशी आशा आहे. करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यावर मी असून केवळ गाण्याकडे लक्ष देतोय. त्यामुळेच तिसरा अल्बम करू शकलो याचा आनंद या गुढीपाडव्याला साजरा करतोय.

गुढीची उंची वाढवायची आहे! – आदेश बांदेकर
यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूपच खास आहे. माझी निर्मिती असलेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचे ३०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. ज्या ‘होम मिनिस्टर’ने मला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवले, त्या कार्यक्रमाचे तीन हजार भाग पूर्ण होत आहेत. शिवसेनेसारख्या महत्त्वाच्या पक्षाचा सचिव म्हणून माझी नियुक्ती झाली. त्याचबरोबर नुकतीच भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही मला सोपविण्यात आली आहे. वर्षभरात जोमाने काम करून मला पुढील वर्षी लोकांच्या घरात आनंदाची गुढी उभारायची आहे. माझी स्पर्धा नेहमीच कालच्या दिवसांशी असते. त्यामुळे या आधी केलेल्या कामापेक्षा पुढील वर्षी जास्त चांगले काम करून या आनंदाच्या गुढीची उंची वाढवायची आहे.

माणूस म्हणून प्रगल्भ करणारी गुढी! आतिशा नाईक
यंदा माझी गुढी ६ एप्रिलला सांगलीतच उभारली गेली. विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सांगलीत पार पडला. मी दिग्दर्शित केलेले हे पहिलेच नाटक. आपण नेहमी काहीतरी वेगळे, आव्हानात्मक करावे, असे वाटत असते. मात्र मी कोणताही संकल्प करत नाही. कारण केलेले संकल्प कधीच तडीला जात नाहीत. माझ्या बाबतीत माझ्या आजूबाजूच्या लोकांनीच यंदा संकल्प करून माझ्यावर या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. लोकांनी ही गुढी माझ्या हाती दिली खरी, पण ती उभारली, असे मी नाही म्हणणार. मी फक्त ती गुढी हाती घेऊन चालले आहे.