विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तेथे त्यांना ‘पॅडमॅन’ म्हणजेच अक्षय कुमारचीही साथ मिळाली आहे. अक्षयने केप टाऊनमध्ये विरुष्काची भेट घेतली असून त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत विराट कसोटी सामना खेळणार आहे. या दौऱ्यात अनुष्कासुद्धा त्याच्यासोबत गेली आहे. तिथल्या रस्त्यांवरील विराटचा भांगडा असो, अनुष्काची शॉपिंग असो किंवा दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ, असे बरेच फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर अक्षय कुमारसुद्धा पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारासोबत केप टाऊनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. नववर्षाचे सेलिब्रेशन आणि ट्विंकलचा वाढदिवस या निमित्ताने ते केप टाऊनला गेले आहेत. एकाच शहरात असल्याने अक्षयने विरुष्काची भेट घेतली. दुपारच्या जेवणासोबत गप्पा मारतानाचा हा फोटो पाहायला मिळत आहे.
इटलीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडल्यानंतर विरुष्काने मित्र परिवारासाठी दिल्ली आणि मुंबईत मोठ्या थाटामाटात रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. मुंबईतल्या रिसेप्शननंतर हे दोघे दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेले. या दौऱ्यानंतर अनुष्का तिचा आगामी चित्रपट ‘सुई धागा’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तर अक्षयचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 11:43 am