16 February 2019

News Flash

Exclusive Newton Movie Director Interview : ‘माझा आनंद द्विगुणीत झाला’

'किमान लोकांना आता नक्षलवादी परिसरातील परिस्थितीची जाण होईल'

‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे.

बर्लिन आणि हाँगकाँग चित्रपट महोत्सवात गौरव झाल्यानंतर ऑस्करसाठी ‘न्यूटन’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागात भारताकडून ‘न्यूटन’ची निवड झाल्याने दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो इतका यशस्वी ठरेल याची अजिबात कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली. ‘आजच चित्रपट प्रदर्शित झाला आणि आजच ऑस्करसाठी प्रवेश मिळाल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. रोमॅन्टिक, ड्रामा, थ्रिलर, अॅक्शन यांसारखाच राजकीय चित्रपटसुद्धा एक जॉनर आहे. नक्षलवादी भागात राहणाऱ्या आदिवासींच्या ज्या समस्या आहेत, तिथली जी परिस्थिती आहे त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि मगच या विषयाला हाताळण्याचा विचार केला. एखादी गोष्ट सुचणं आणि त्यावर अभ्यास करून त्यातून कलाकृती निर्माण करणं ही प्रक्रिया फार महत्त्वाची आणि मजेशीर असते. मी कोणता विषय घेतोय याहीपेक्षा मला जे पटतंय त्यावर चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होणं मला आवडतं.’ असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे या चित्रपटाद्वारे बदल जरी घडला नाही तरी किमान लोकांना नक्षलवादी परिसरातील आदिवासींच्या परिस्थितीची तरी जाण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

‘न्यूटन’ हा चित्रपट चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे यामध्ये मुख्य भूमिका साकारत असलेला अभिनेता राजकुमार राव. त्याविषयी मसूरकर म्हणतो की, ‘विविध धाटणीचे चित्रपट आणि अनोख्या भूमिका साकारणं राजकुमारला फार आवडतं. प्रत्येक भूमिकेसाठी तो तितकीच मेहनतदेखील घेतो. भूमिकांच्या बाबतीत आव्हानं स्विकारणं त्याला आवडतं. शूटिंगसाठीही तो पहाटे लवकर उठून दोन तास मेकअपसाठी द्यायचा.’

शब्दांकन- स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

First Published on September 22, 2017 5:09 pm

Web Title: newton director amit masurkar reaction on getting his film official entry for oscars 2018 from india