‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी परदेशी चित्रपट विभागात एखाद्या चित्रपटाची निवड झाल्यानंतर तोच चित्रपट का? यावर वादविवाद झडतात. ‘ऑस्कर’साठी नेमका कोणत्या पद्धतीचा चित्रपट निवडला जावा, यावर अनेक मतमतांतरे आहेत. तिथे जाणारा सिनेमा हा वास्तववादी असावा, हा दृष्टिकोन इथे महत्त्वाचा ठरत असला, तरी इतक्या वर्षांमध्ये ‘ऑस्कर’साठी चित्रपट पाठवताना हरतऱ्हेचे प्रयोग करून झाले आहेत. सुदैवाने, गेल्या दोन-तीन वर्षांत जे चित्रपट ‘ऑस्कर’साठी पाठवले गेले त्यांच्यावरून वाद झालेले नाहीत. अगदी अमित मसूरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ हा चित्रपट सर्वसामान्यांनी पाहिलेला नव्हता तरीही या चित्रपटाच्या निवडीवरून कोणीही शंका व्यक्त केलेली नाही. मात्र इतक्या वर्षांच्या प्रयोगानंतरही तीन चित्रपट वगळता एकाही चित्रपटाला नामांकन फेरीपर्यंतचे सीमोल्लंघन करता आलेले नाही. २००१ साली   आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ने नामांकन फेरीपर्यंत धडक मारली. त्यानंतर सोळा वर्षे झाली आहेत. अजूनही नामांकन फेरीपर्यंतचा पल्ला आपल्याला गाठता आलेला नाही..

२००१ साली आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा तसा बिग बजेट, मोठय़ा लांबीचा चित्रपट ‘ऑस्कर’साठी म्हणून पाठवला गेला तेव्हाही वाद झाले होते. ‘ऑस्कर’ पुरस्कार स्पर्धेत जिथे जगभरातील देशांमधून आलेले दोन तासांची आटोपशीर लांबी असलेले चित्रपट दाखवले जातात, पाहिले जातात. तिथे ‘लगान’ हा मोठा चित्रपट, नृत्य आणि गाण्यांची रेलचेल असलेला चित्रपट पाठवू नये, असा पवित्रा घेतला गेला होता. मात्र त्यावेळी दिग्दर्शक म्हणून आशुतोष गोवारीकर आपल्या मतावर ठाम राहिला. गाणी आणि नृत्यप्रधान चित्रपट ही आपल्या चित्रपटांची ओळख आहे. ती आपली संस्कृती आहे आणि ती चित्रपटांतून दिसलीच पाहिजे. ती त्या लोकांना नक्की आवडेल, हे आशुतोषचे ठाम मत होते. आणि त्याच्या या विचारात तथ्यही होते हे नंतर सिद्धही झाले, असे चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी सांगितले. ‘लगान’ नामांकन फेरीत पोहोचला. नृत्य-गाणी असलेला हा चित्रपट हॉलीवूडमध्ये पाहिला गेला, त्याची दखल घेतली गेली. म्हणूनच तो नामांकन फेरीसाठी निवडला गेला. पण ती कमाल त्यानंतर आपल्याला साधलेली नाही.

मुळात आपल्याकडे ‘ऑस्कर’साठी म्हणून कोणी चित्रपट करत नाही. त्यामुळे त्यांचे जे निकष आहेत त्यांचाही विचार केला जात नाही. पण ‘ऑस्कर’साठी चित्रपट पाठवण्यात फेडरेशनच्या निवड समितीची भूमिका महत्त्वाची ठरते आणि गोंधळ नेमका तिथेच आहे, असं मत चित्रपट समीक्षक-अभ्यासक गणेश मतकरी यांनी मांडलं. निवड समितीतील लोकांचा चित्रपटाकडे आणि ऑस्कर पुरस्कारांकडे पाहण्याचा वैयक्तिक दृष्टिकोन कसा आहे त्यावर बऱ्याचदा ही निवड होते. खरेतर, ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी नेमके कोणते चित्रपट असायला हवेत, त्याचे निकष काय आहेत याचा अभ्यास करायला, त्याचा अवाका यायला निवड समितीला पुरेसा वेळ मिळायला हवा. एक वर्षांचा कालावधी हा त्यासाठी पुरेसा नाही. एका निवड समितीला जर पाच वर्षांचा कालावधी दिला गेला तर त्यांनी पाठवलेला चित्रपट ‘ऑस्कर’च्या नामांकन फेरीत पोहोचला नाही तर त्यामागची कारणे लक्षात घेऊन दुसऱ्या चित्रपटाच्या निवडीआधी त्यांना विचार करायला वाव मिळू शकतो. प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यातल्या त्यात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’सारखा चित्रपट जेव्हा पाठवला गेला तेव्हा तो आधीच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून दाखवला गेला असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच प्रतिसाद मिळाला होता. म्हणजे या चित्रपटाचा नामांकन फेरीसाठी विचार व्हायला हवा होता, अशी मागणी खुद्द हॉलीवूडमधूनच झाली होती. ‘कोर्ट’ला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आजच्या आणि वास्तव विषयांना हात घालणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देत ‘न्यूटन’ची यावर्षी निवड झाली असावी, असा अंदाज मतकरी यांनी व्यक्त केला. गेल्या वीस वर्षांतील चित्रपटांचा आढावा घेतला तर कित्येकदा मोठय़ा निर्मात्यांचेच चित्रपट ऑस्करसाठी पाठवले गेले आहेत, हे दिसून येते. आता किमान अशा पद्धतीने वाटेल ते चित्रपट निवडले जात नसले, तरीही ज्या जबाबदारीने ते चित्रपट पाठवायला हवेत त्याची जाणीव होईपर्यंत पुरेसा वेळ समितीला देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑस्कर आणि मराठी पताका

अमित मसूरकर या मराठी दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या स्पर्धेसाठी पाठवला गेला. आतापर्यंत तीन मराठी दिग्दर्शकांचे हिंदी चित्रपट आणि तीन मराठी चित्रपट ‘ऑस्कर’साठी पाठवले गेले आहेत. इथेही ‘लगान’चा उल्लेख पहिला आणि महत्त्वाचा ठरतो. आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ नामांकन फेरीपर्यंत पोहोचला एवढेच नाही. तर त्यावेळी त्याने स्वत: तिथे जाऊन चित्रपट तिथल्या लोकोंपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला हवे हे समजून घेतले होते. त्याचा अभ्यास केला आणि मग दुसऱ्या वेळी आशुतोष आणि आमिर खान दोघांनी जाऊन ‘लगान’ तिथे दाखवला. तशाच पद्धतीचे प्रयत्न त्यानंतर ‘श्वास’ ऑस्करसाठी पाठवला गेला तेव्हा दिग्दर्शक संदीप सावंत आणि निर्मात्यांनी केले होते. पण त्यांना यश मिळाले नाही, अशी माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली. ‘लगान’, अमोल पालेकर दिग्दर्शित ‘पहेली’ आणि अमित मसूरकरचा ‘न्यूटन’ हे तीन मराठी दिग्दर्शकांचे हिंदी चित्रपट ऑस्करचा दरवाजा ठोठावते झाले. तर संदीप सावंत ‘श्वास’, परेश मोकाशी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि चैतन्य ताम्हाणे ‘कोर्ट’ हे तीन मराठी दिग्दर्शक तिथपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनीही आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी हा मान मिळवला आहे. अर्थात, त्यांचीही स्पर्धा प्राथमिक फेरीतच संपुष्टात आली होती. आता यावर्षी तरी प्राथमिक फेरीतून नामांकन फेरीपर्यंतचे सीमोल्लंघन ‘न्यूटन’ने तरी करावे, ही चाहत्यांची अपेक्षा आहेच!