अ‍ॅक्शनवर आधारित असा रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’ नुकताच पार पडला. या अ‍ॅक्शन शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी करत होता. रविवारी या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. भारतात शूट करण्यात आलेल्या ‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’ची अभिनेत्री निया शर्मा विजेती ठरली आहे.

शनिवारी सेमी फिनाले नंतर टॉप ५ स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. त्यामध्ये अली गोणी, निया शर्मा, करण वाही, जॅस्मिन भसीन आणि भारती सिंह या स्पर्धकांचा समावेश होता. या पाच स्पर्धकांमधील करण वाही, जॅस्मिन भसीन आणि निया शर्मा या तिघांमध्ये शेवटचा टास्क पार पडला. त्यात निया शर्माने ‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’च्या ट्रॉफिवर स्वत:चे नाव कोरले.

‘खतरों के खिलाडी मेड इन इंडिया’चे चित्रीकरण मुंबईमधील फिल्म सिटीमध्ये झाले होते. तसेच शोच्या पहिल्या काही भागांचे सूत्रसंचालन फराह खानने केले होते. त्यानंतर रोहित शेट्टी पुन्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला.

या पूर्वी जुलै महिन्यात ‘खतरों के खिलाडी’ सीजन १० पार पडला. हा शोची शूटिंग बल्गेरिया येथे झाली. तर शोचा फिनाले मुंबईतील फिल्म सिटीमध्ये पार पडला. या दहाव्या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री करिश्मा तन्नाने मिळवलंय.