देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनास यांच्या कथित प्रेमप्रकरणाची चर्चा बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सुरू आहे. अशातच निकच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीनं या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकीकडे प्रियांका आणि तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या निकनं आपल्या नात्याविषयी मौन बाळगणं पसंत केलं आहे तर दुसरीकडे डेल्टा गॉर्डेमनं दिलेल्या मुलाखतीमुळे नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

साधरण पाचएक वर्षांपूर्वी निक ऑस्ट्रेलियन गायिक डेल्टा गॉर्डेमनला डेट करत होता. पण वर्षभरातच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. २०१७ पासून निक आणि प्रियांकामधली जवळीक वाढत गेली. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून या दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहण्यात आलं होतं. पण दोघांनी अद्यापही आपल्या नात्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अशातच एका मुलाखतीत डेल्टा गॉर्डेमन हिनं निकचं प्रियांकावर प्रेम असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

निक आणि माझ्यातले बिघडलेले संबंध मी पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्यासोबत नव्यानं सुरूवात करायची होती. यासाठी मी त्याची भेटही घेतली पण त्यानं मात्र माझ्या मनात प्रियांकाविषयी प्रेमाची भावना असल्याचं माझ्याजवळ कबुल केलं. हे ऐकून खरं तर मला खूप वाईट वाटलं. मी प्रियांकाची जागा कधीच घेऊ शकत नाही. मी तिच्याशी स्पर्धाही करू शकत नाही. प्रियांकाचे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल सारख्या मोठ्या लोकांशी संबंध देखील आहे. असं ती एका मुलाखतीत म्हणाली.
निकच्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे ऐकून मला खूपच दु:ख झालं अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे. या दोघांविषयी चर्चा ऐकल्यानंतर आपल्याला त्रास होतो असंही तिनं कबुल केलं आहे.