बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ या नावाने सर्वपरिचित असलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता विदेशी सून झाली आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनाससोबत जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणाऱ्या या जोडीला लग्न करुन काही दिवसच झाले असून त्यांना आता फॅमिली प्लॅनिंगचा विचार सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये निकने स्वत:च त्याचा लवकरच बाबा व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा इशाचा लग्नसोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये नवविवाहित दाम्पत्य प्रियांका आणि निकने उपस्थिती दर्शविली होती. मात्र हे लग्न झाल्यानंतर निक लगेचच अमेरिकेसाठी रवाना झाला. विशेष म्हणजे निकला अमेरिकेला परत जाताना पाहून देसीगर्लचे डोळे मात्र पाणावलेले दिसले. त्यामुळे सध्या या दोघांचे विमानतळावरील हे फोटो व्हायरल झाले होते. त्यातच निकने काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीचीही चर्चा रंगली आहे. या मुलाखतीमध्ये निकने त्याला बाबा व्हायचं आहे असं म्हटलं आहे.

‘मला लहान मुलं प्रचंड आवडतात. त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादं लहान मूल आलं तर आम्हाला नक्कीच आवडेल. आयुष्यात मी अनेक चढउतार पाहिले आहेत. या जीवनाने मला कमी वयात खूप काही शिकवलं आहे. या कारणामुळेच मी आज एक जबाबदार व्यक्ती होऊ शकलो. त्यामुळे मी लहान मुलाची जबाबदारी नीट पार पाडू शकतो असा मला विश्वास आहे. मला लवकरच बाबा व्हायला आवडेल’, असं निक म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘आयुष्यात मला जे काही चांगले-वाईट अनुभव आले ते मला माझ्या मुलांसोबत शेअर करायला नक्कीच आवडतील. हे सारं माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच असेल’. निकपूर्वी प्रियांकानेदेखील आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रियांकादेखील तिच्या मुलांसाठी एक्साइट आहे. तिला ‘बेबी फिवर’ आहे, असंदेखील ती म्हणाली होती.