निळू फुले तरुण रुपात तर अश्विनी भावे वृध्देच्या भूमिकेत… छायाचित्रच ते दाखवतंय. बरं, हा अनोखा प्रणय रंगलाय तो गोव्याच्या मस्त समुद्र किनारी… हा चित्रपट होता, एम. एस. रंजन दिग्दर्शित ‘ठणठणगोपाळ’. चित्रपटात अशोक सराफ, रेखा राव, लक्ष्मीकांत बेर्डे, नयनतारा इत्यादींच्याही भूमिका होत्या. चेंबूरच्या एका बंगल्यातील चित्रीकरणानंतर गोव्यातले चित्रीकरण अगदी वेगळे होते. अश्विनी तरुण म्हणूनही चित्रीकरणात सहभाग घेत होती आणि रुप पालटूनही निळूभाऊसोबतही ही अशी गंमत करीत होती. अर्थात, हा सगळा प्रकार म्हणजे कथेची गरज होती.

निळूभाऊंनी बेरक्या राजकारणी, स्त्रीलंपट या सराईत भूमिकांसह ‘हऱ्या नाऱ्या जिंदाबाद’, ‘थापाड्या’ अशा चित्रपटात विनोदी नायक ही साकारलाय. खरं तर प्रत्यक्ष माणूस गंभीर प्रवृत्तीचा पण एकदा का भूमिकेत शिरणे झाले की त्या व्यक्तिरेखेचे होणे हा त्यांचा शिरस्ता. म्हणूनच तर तेथे, तरुण होत मजा घेताना ते खुलले, अश्विनी केवढी तरी अष्टपैलू. ती ‘शाबास सुनबाई’. ‘आहुती’, ‘वजीर’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘हळदं रुसली कुंकू हसलं’ या प्रत्येकात वेगळी दिसली. तिला वृध्देचे सोंग घेणे जमले. निळू भाऊंसोबतचे हे प्रसंग छान अनुभवले. १९९२ चा हा चित्रपट, एव्हाना विनोदीपटाची लाट बरीचशी स्थिरावलेली. अश्विनीचा ‘हीना’ प्रदर्शित होवून गेला होता. तिच्या अभिनय, नृत्य आणि सौदर्याची भरपूर वाखाणणी झाली होती. त्यामुळे हिंदीचे वलय तिच्या नावाभोवती होते. पण मराठीच्या सेटवर तिने कधीही हिंदीतला झोत स्वत:सोबत ठेवला नाही. ‘ठणठणगोपाळ’मधील छायाचित्रातील ही रुपे या दोघांसाठीही वेगळी ठरली.

दिलीप ठाकूर