‘ती अमेरिकेत वाढली असली तरी आपला देश, येथील संस्कृती विसरलेली नाही. तिला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष प्रेम आहे. भारतीय चित्रपट तर तिला खूपच आवडतात’.. ‘मिस अमेरिका’ हा किताब पटकावणाऱ्या नीना दावुलिरीची काकी तिचे कौतुक करताना हरखून गेली होती.
आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. ज्या वेळी तिच्या शिरपेचात ‘मिस अमेरिके’चा मुकुट परिधान करण्यात आला, त्या वेळी आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही खूपच भावनाविवश झालो होतो, असे नीनाची काकी ससिबाला सांगत होती. नीनाचे वडील दावुलिरी धना कोटेस्वरा चौधरी हे व्यवसायाने डॉक्टर असून, १९७०मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले. नीना अमेरिकेतच वाढली असली तरी भारताबद्दल तिला विशेष ओढा आहे.‘नीना दरवर्षी उन्हाळय़ात भारतात येते. विजयवाडय़ाला आमच्या घरी राहण्यास तिला खूपच आवडते. ती येथील शास्त्रीय नृत्यही शिकलेली आहे. भारतीय चित्रपट, बॉलीवूड चित्रपटांमधील नृत्य तर तिला खूपच आवडते.  असे ससिबाला यांनी सांगितले. अस्खलित तेलगू बोलणाऱ्या नीनाला आपल्या वडिलांसारखेच डॉक्टर होण्याची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.
समुद्रात पवित्र डुबकी
न्यू जर्सी : ‘मिस अमेरिके’चा मुकुट परिधान केल्यानंतर नीनावर वांशिक टिप्पणी करण्यात आल्यानंतरही तिने त्याकडे दुर्लक्ष करत आपण आनंदी असल्याचे सांगितले. मी स्वत:ला प्रथम अमेरिकी असल्याचेच समजते. त्यामुळे माझ्यावर झालेल्या टिप्पणीबद्दल मला वाईट वाटलेले नाही, असे तिने सांगितले. मंगळवारी सकाळी तिने न्यू जर्सीला भेट दिली आणि अंटलांटिक सिटीतील समुद्रात पवित्र डुबकी मारली. या वेळी तिचे छायाचित्र टिपण्यासाठी  समुद्रकिनारी गर्दी केली होती.