छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं बारावं पर्व सध्या सुरू आहे. नेहमीप्रमाणे यंदाचा सिझनसुद्धा शोमधील स्पर्धक आणि त्यांच्यातील वादांमुळे चर्चेत आहे. या शोविषयी अनेकांनाच कुतूहल असतं. बिग बॉसच्या घरात स्पर्धक कसे राहत असतील, ते खरंच स्वयंपाक आणि इतर कामं स्वत: करत असतील का असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना असतील. सर्वसामान्यांची हीच शंका दूर करण्यासाठी बिग बॉसची माजी स्पर्धक नितिभा कौल हिने एक व्हिडिओ शूट करून युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने बिग बॉसच्या घरातील १० सिक्रेट्स म्हणजेच १० अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या फक्त बिग बॉसच्या घरात राहिलेल्या स्पर्धकांनाच माहित आहेत. तर जाणून घेऊयात काय आहेत या १० गोष्टी..

१. बिग बॉसच्या घरात स्पर्धक स्वत:च स्वयंपाक करतात. पण आठवड्याअखेर जेव्हा ‘वीकेंड का वार’ भाग शूट होतो. तेव्हा स्पर्धक स्वयंपाक करत नाहीत. कारण त्यादिवशी थेट सलमान खानच्या घरातून स्पर्धकांसाठी जेवण येतं. सलमान त्याच्या खास शेफकडून स्पर्धकांसाठी जेवण बनवून घेतो. इतकंच नव्हे तर ‘वीकेंड का वार’ शूट होण्यापूर्वी जेवण कसं होतं हे सलमान आवर्जून स्पर्धकांना विचारतो. एकेदिवशी जेव्हा स्पर्धकांना सलमानच्या घरातून आलेलं जेवण मिळालं नाही, तेव्हा त्याने शूटिंग अर्ध्यावरच थांबवून बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमची कानउघडणी केली होती.

२. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दारू पिण्याची परवानगी नाही. घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे बॅग्स व्यवस्थित तपासले जातात, त्यामुळे स्पर्धक बॅगमध्ये लपवून दारू घरात घेऊन जाऊ शकत नाही. पण सिगारेट पिण्याची परवानगी त्यांना आहे.

३. बिग बॉसचं घर स्पर्धकांना मध्येच सोडता येत नाही. कार्यक्रमाच्या करारानुसार जर स्पर्धकाने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला तर त्याला दोन कोटी रुपयांचा दंड भरावा लागतो.

४. बिग बॉसच्या घराला चारही बाजूंनी काच लावलेली. या काचेच्या बाहेर क्रू मेंबर्स सतत गस्त घालत असतात. या क्रू मेंबर्सना त्या काचेतून घरातील सर्व काही पाहता येऊ शकतं पण स्पर्धकांना बाहेरचं काहीच दिसत नाही.

५. बिग बॉसच्या नव्या पर्वाचं प्रीमिअर पार पडण्याआधी स्पर्धकांच्या ओळखीबाबत टीमकडून कमालीची गोपनियता पाळण्यात येते. स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात आणण्यापूर्वी त्यांचा चेहरा पूर्णपणे झाकला जातो आणि डोळांवरही पट्टी बांधली जाते. स्पर्धकांची ओळख प्रसारमाध्यमांमध्ये उघड होऊ नये यासाठी ही गोपनियता पाळली जाते.

६. बिग बॉसच्या घरात एकही घड्याळ नसल्याने स्पर्धकांना वेळ कळत नाही. टेलिव्हिजनवर प्रसारण होताना जरी ठराविक वेळ दाखवली जात असली तरी स्पर्धकांना सकाळी रोज वेगवेगळ्या वेळेला उठवलं जातं. आदल्या दिवशी शूटिंग उशिरा संपल्यास, दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धकांना उशिरा उठवलं जातं.

७. या कार्यक्रमात जाताना प्रत्येक स्पर्धक केवळ दोन बॅग घेऊन जाऊ शकतो. यामध्ये ते गॉगल, कॅप, घड्याळ यांसारख्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाहीत. तसेच घरात जाण्यापूर्वी स्पर्धकांच्या सगळ्या सामानांची चेकिंग केली जाते. कोणत्याही ब्रँडचा उल्लेख कपड्यांवर असल्यास ते कपडे शोमध्ये वापरता येत नाहीत.

८. शनिवार हा स्पर्धकांसाठी सुट्टीचा दिवस असतो. यादिवशी जर एखादं मोठं भांडण किंवा वाद झाला तरच तो रविवार किंवा सोमवारच्या भागात दाखवला जातो. पण शनिवारी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक त्यांच्या मनासारखं वागू शकतात आणि त्यांना कोणताही टास्क दिला जात नाही.

९. आठवडाभर घराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही स्पर्धकांवर असते. या स्वच्छतेत काही कमतरता जाणवल्यास बिग बॉसकडून दंड दिला जातो. पण गरज भासल्यास सर्व स्पर्धक झोपल्यानंतर साफसफाई कर्मचारी घरात येऊन साफसफाई करून जातात आणि हे कर्मचारी स्पर्धकांना दिसू नयेत यासाठी स्पर्धकांच्या बिछान्याभोवती पडदा टाकला जातो.

१०. घरातील स्पर्धकांना जर मेकअप किंवा कपड्यांची विशेष मागणी करायची असल्यास कॅमेरासमोर ते बोलू शकतात. स्पर्धकांच्या घरच्यांकडून ते सामान मागवलं जातं आणि ते बिग बॉसच्या घरात पाठवलं जातं.