गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाहिन्यांवर होणारे संगीताचे आणि गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोचे कार्यक्रम पाहिलेले नाहीत. त्यात शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी सादर होतात की नाही, त्याचीही कल्पना नाही. त्यामुळे त्याविषयी काही बोलणे योग्य ठरणार नाही. पण, पूर्वी माझ्यासह शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज मंडळी अशा शोसाठी  परीक्षक म्हणून काम क रत होते. तेव्हा अंतिम निर्णय देताना आम्हा परीक्षकांच्या मताला खूप महत्व होते. आमच्या शब्दाला मान होता. आता आमच्या मताला, निर्णयाला फारसे महत्व दिले जात नाही. ‘एसएमएस’ किंवा अन्य पर्यायांद्वारे अंतिम फेरीतील विजयी स्पर्धकाची निवड केली जाते. काही वेळेस परीक्षकांचा निर्णयही बदलला जातो. हे माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे मी हल्ली संगीताच्या किंवा गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना केले.
पं. शर्मा यांच्या जीवनावर आधारित आणि त्यांच्या संगीत कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या इना पुरी लिखित ‘द मॅन अ‍ॅण्ड हिज म्युझिक’या कॉफी टेबलबुकचे प्रकाशन २७ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते बोलत होते.    
आणि शिवकुमार शर्मा यांनी घर सोडले
आम्ही मूळचे जम्मू-काश्मिरचे. माझे वडील पं. उमादत्त शर्मा यांचा आग्रह होता की मी जम्मूमध्येच राहून तेथेच नोकरी करावी. जम्मू आकाशवाणी केंद्रावर संगीत दिग्दर्शक म्हणून मला नोकरीची संधीही आली होती. पण, मला नोकरी करायची नव्हती. त्यामुळे वडिलांची इच्छा डावलून मी घर सोडले आणि मुंबईत आलो. माझे वडील शेवटपर्यंत जम्मूू-काश्मिरमध्येच राहिले. संतूर हे मुळचे तेथील वाद्य. जम्मू आणि काश्मिरच्या बाहेर त्याची कोणाला फारशी माहिती नव्हती. या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणे हे माझे ध्येय आणि ध्यास होता. जम्मू-काश्मिरमध्ये असताना मी तबलाही वाजवायचो. व्यावसायिक स्तरावरही तेव्हा तबला वादन केले होते. पण, संतूर या वाद्याला प्रस्थापित करण्यासाठी नंतर मी माझे सर्व लक्ष संतूरवरच केंद्रीत केल्याचे पं. शर्मा म्हणाले.
‘मोसे छल किए जाए’ गाण्यातील संतूर वादन
 मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात मी संगीतकारांकडे संतूरवादक म्हणून काम केले. ‘झनक झनक पायल बाजे’ चित्रपटात संतूर या वाद्याचा वापर केला गेला आहे. ‘गाईड’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘मोसे छल किए जाए’ या लोकप्रिय गाण्यात संतूरचा उपयोग केला असून ते मी वाजविले आहे. चित्रपटाचे संगीतकार एस. डी. बर्मन यांनी या गाण्यात चपखलपणे संतूरचा उपयोग करून घेतला आहे.  
संतूर, संतूर आणि फक्त संतूर !
माणसाने आपल्या आयुष्यात काही ध्येय नक्की केलेले असते. त्याच्या पूर्ततेसाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. पण, काही वेळेस त्याच्या ध्येयपूर्तीच्या आड काही प्रलोभने येतात. त्याने ठरविलेल्या ध्येयासाठी तो अडथळा ठरू शकतो. चित्रपटात भूमिका करण्यासाठी झालेली विचारणा किंवा अन्य स्वरुपात माझ्याहीसमोर प्रलोभने आली. पण, परमेश्वराची कृपा आणि योग्य मार्गदर्शनामुळे मी त्याला बळी पडलो नाही. देवावर माझी श्रद्धा असून आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्याचा आशीर्वाद मिळत गेला.
संतूर, संतूर आणि फक्त संतूरच हे मी माझ्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. या वाद्याला मला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, असा माझा ध्यास होता. या प्रयत्नांना योग्य साथही मिळाली, असेही पं. शर्मा यांनी सांगितले.