अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्याप्रकरणी ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी यांनी पोलिसांत अर्ज सादर केला आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांनी हा अर्ज दिला असून गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी आधीही तपास केल्याची माहिती दिली.

‘सेटवर कोणतीही विनयभंगाची घटना घडली नाही. हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे,’ असं सामी सिद्दीकींनी त्यांच्या अर्जात म्हटलं आहे. तनुश्री दत्ताने शनिवारी अभिनेते नाना पाटेकर, निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तकारीनंतर सामी सिद्दीकींनी हा अर्ज सादर केला.

वाचा : तनुश्री-नाना वादात विनाकारण नाव गोवल्या गेलेल्या अक्षयची पोलिसांकडे धाव

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. दरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळले असून तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. मासिक पाळीमुळे तनुश्रीने शूटिंगदरम्यान चिडचिड केली असावी अशी लाजीरवाणी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी यांनी स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिली होती. शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं असा प्रश्न विचारला असता सिद्दीकी म्हणाले, ‘मी तुम्हाला सत्य सांगावं का? मला असं वाटतं की त्यावेळी मासिक पाळीमुळे तनुश्रीची चिडचिड झाली असावी. म्हणूनच जराशा स्पर्शानेही तिने इतका मोठा वाद निर्माण केला. नेमकं काय घडलं हे मलासुद्धा माहित नाही कारण मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो.’