एकीकडे मराठी चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट तीन-चार कोटीपर्यंत वाढल्याच्या आणि ‘गल्ला पेटी’वर पाच-सहा कोटी रुपये कमाईच्या बातम्या गाजत असल्या तरी ब-याचशा मराठी कलाकारांना त्यांच्या कामाचा ठरलेला मेहनताना मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्याबाबत उघडपणे बोलण्यात बरेचजण धजावत नाहीत, असे दिसते.
पण सिया पाटीलने मात्र, मराठी चित्रपटातून भूमिका साकारण्याचे पुरेसे पैसे मिळत नाहीत म्हणूनच आता हिंदी मालिकांतून भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे. काही निर्मात्याना वारंवार कल्पना देवूनही ते मानधनाबाबत टाळाटाळ करतात असा सियाचा अनुभव आहे. विशेषत: मालाड येथे आपण घेतलेल्या नव्या घरासाठी चांगली वस्तू खरेदी करण्याकरता तरी पैसे द्या असे ती निर्मात्याना सांगते. असे असूनही सियाची भूमिका असणारे सहा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. त्यात जागरण आणि बोल बोबी बोल इत्यादी मराठी चित्रपटांचा समावेश आहे.