‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातील ‘इश्कवाला लव्ह’ या गाण्याची खिल्ली उडवणाऱ्या चित्रफितीत सहभागी होऊन ‘मी माझ्यावर झालेली टीका खिलाडूवृत्तीने घेते’ हे दाखवून देणा-या आलिया भटने तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘शो’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या ‘सामान्य ज्ञाना’ची छोटीशी झलक सर्वाना दाखवली होती. नंतर ती एका पुरस्कार समारंभाला गेली असता पत्रकारांनी तिला काही ‘सोपे-सोपे’ सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारले नाही. एकाचेही उत्तर ती देऊ शकली नाही. त्यामुळे आलिया नेटिझन्सच्या विनोदांचा चर्चेचा विषय बनली होती. पण, त्यावेळी तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ तिने आता टाकला आहे.

सदर व्हिडिओत सामान्य ज्ञानात शून्य असणारी आलिया कशी नंबर वन होते हे दाखविण्यात आले आहे. यात तिच्यासोबत परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, करण जोहर, महेश भट आणि अन्य काही सेलिब्रेटींचाही समावेश करण्यात आला आहे. ‘जिनिअस ऑफ द इयर’ या दहा मिनिटांच्या व्हिडिओत आलिया अभिनय करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसते. ‘कॉफी विथ करण’मध्ये आलियाच्या सामान्य ज्ञानाची सर्वांना प्रचिती आल्यानंतर तिच्यावर करण्यात आलेल्या विनोदांना ती कशी सामोरी गेली ते यात चित्रीत करण्यात आले आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित या डोक्युमेंटरीमध्ये आलियाच्याच गाण्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. ‘सॅटर्डे सॅटर्डे’ गाण्याची ‘फर्राडे फर्राडे’ तर ‘राधा ऑन द डान्स फ्लोर’ला ‘सोडिअम ऑन द डान्स फ्लोर’ असे म्हटले आहे. या व्हिडीओनंतर आलियाने ट्विट केले की, “आलिया भट विनोदांनंतर, मी माझे सामान्य ज्ञान सुधारण्याचे ठरविले. हे बघा#AlB @AllIndiaBakchod.” तसेच, तिला साथ देण्यासाठी तिने मित्रांचे आणि कुटुंबियांचेही आभार मानले.