नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने अकलूजच्या रिंकु राजगुरु या शाळकरी मुलीला प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलं. रिंकुने ‘सैराट’ चित्रपटात साकारलेली आर्ची अनेकांना भावली. परंतु, आर्चीची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली आहे की तिला आता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांशिवाय जाणंही शक्य नाही. हीच परिस्थिच्या तिच्या शाळेतही आहे. त्यामुळे रिंकु राजगुरुने शाळेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा रिंकु दहावीला आहे. असं असतानाही तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनला रिंकुच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यात आल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

काही दिवसांपूर्वी रिंकू शाळेत रुजू झाली होती. पण तिची क्रेझ मात्र काही कमी झाली नाही. ती शिक्षण सोडणार नाहीए. पण शाळेत गेल्यावर मुलांची तिच्याच भोवती जास्त गर्दी वाढते. त्यामुळे तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिंकूच्या वडिलांनी तिच्यासाठी एसएससीचा १७ नंबरच फॉर्म भरला असल्याची माहिती मिळाली आहे. तुर्तास रिंकु घरीच राहून अभ्यासाकडे लक्ष देत असून सध्यातरी तिच्याकडे कोणताही चित्रपट नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
‘सैराट’ चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसलेले कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्या खाजगी जीवनाबद्दलही अनेकांना कुतुहल आहे. त्यातही ‘आर्ची’ म्हणजेच रिंकु राजगुरुच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीविषयीच प्रेक्षकांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. दहिहंडीलाही अनेक ठिकाणी यावेळी आर्चीचीच क्रेझ पाहायला मिळाली.