‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं जितकं कौतुक झालं, तितकीच टीकासुद्धा झाली. शाहिद कपूरने साकारलेल्या कबीर सिंग या पात्रावर अनेकांनी आक्षेप घेतला. शाहिदने बराच वेळ यावर मौन बाळगलं होतं. पण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर मात्र शाहिदने प्रेक्षकांवर पलटवार केला. यावेळी त्याने शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ व रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटातील दृश्यांची उदाहरणं देत प्रेक्षकांना सवाल केला.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला, ”स्वत:ला कसं सांभाळायचं हे कबीरला माहित नव्हतं. अशा प्रत्येक कबीरच्या आयुष्यात प्रीतीची गरज आहे. ‘बाजीगर’मध्ये जेव्हा शाहरुख शिल्पाचा खून करतो तेव्हा कोणी प्रश्न उपस्थित केला नव्हता. इतकंच नाही तर ‘संजू’मध्ये सोनम कपूरच्या गळ्यात कमोडची सीट घातली जाते तेव्हासुद्धा प्रेक्षकांनी आक्षेप घेतला नाही. मग आता सगळे जण ‘कबीर सिंग’च्या मागे का लागले आहेत?”

चित्रपट नेमका कशासाठी आहे याबद्दल स्पष्ट करताना तो पुढे म्हणाला, ”सिनेमाकडे तुम्ही जर शैक्षणिक संस्था म्हणून पाहात असाल तर हा तुमचा पर्याय आहे. सिनेमा हा आयुष्याचा आरसा असतो. सत्य मांडण्यासाठी हे माध्यम वापरलं जातं. चित्रपटाची कथा ही काल्पनिक आहे हे तुम्हाला माहित आहे. मी तर माझ्या खऱ्या आयुष्यात असे प्रसंग पाहिलेत. जेव्हा एखाद्या जोडप्यात भांडण होतं, तेव्हा ते भांडण पाहणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल वेगळंच काहीतरी वाटत असतं. स्वावलंबी महिला सर्वसाधारण मुलाला डेट करतात आणि त्याउलट घडताना दिसतं. हेच आयुष्य आहे आणि हे अनाकलनीय आहे.”

आणखी वाचा : ‘मणिकर्णिका’नंतर अंकिताला मिळाला एक मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट

विशेष म्हणजे ‘कबीर सिंग’ हा या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहिदच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहिदच्या करिअरमधला हा सर्वोत्तम अभिनयाचा चित्रपट ठरला, असंही चित्रपट समीक्षकांनी म्हटलं आहे.