गोव्यात सुरु असलेला ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत आहे. महोत्सव सुरु होण्यापूर्वी दिग्दर्शक रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना वगळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी इतरही मराठी चित्रपट या महोत्सवातून माघार घेतली असं म्हटलं जात होतं. मराठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार इफ्फीत आवाज उठवतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही.

या महोत्सवात शुक्रवारी पाच वाजता रवी जाधव यांची मुख्य भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी ‘न्यूड’ला वगळल्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, तसं काहीच झालं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कोणताही विरोध न होता स्क्रिनिंग सुरळीत पार पडलं.

वाचा : अध्ययन सुमनच्या आयुष्यात तिची एण्ट्री

महोत्सवाच्या परीक्षकांकडून निवड झाल्यानंतर अंतिम क्षणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ‘न्यूड’ आणि मल्याळम चित्रपट ‘एस दुर्गा’ वगळण्यात आला. यासंदर्भात परीक्षकांनाही कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी याचा विरोध करत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयावर राग व्यक्त केला होता.