सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्येपूर्वी आयोजित केलेल्या पार्टीत काही राजकीय नेते उपस्थित असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. यावर मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी माहिती दिली आहे. ‘इंडिया टुडे टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “दिशाच्या होणाऱ्या पतीच्या घरी ८ जून रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पण या पार्टीला कोणतेही राजकीय नेते उपस्थित नव्हते.” त्यामुळे दिशाच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

“दिशाचा होणारा पती रोहन रॉय याच्यासह पार्टीत पाच जण उपस्थित होते. पण त्यात कोणतेही राजकीय नेते नव्हते. दिशाने मध्यरात्री ३ वाजता आत्महत्या केली. आम्ही सीसीटीव्ही फुटेत तपासले असून संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दोन प्रोजेक्ट्सची कामं न झाल्याने दिशा तणावात होती”, अशी माहिती परम बीर सिंग यांनी दिली.

आणखी वाचा : सुशांत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

दिशाने मालाडमधील इमारतीवरून उडी मारून ८ जून रोजी आत्महत्या केली होती. ती २८ वर्षांची होती. दिशाच्या आत्महत्येच्या चार-पाच दिवस आधीच दिशा आणि रोहन मालाड इथल्या घरात राहायला गेले होते. परदेशी राहत असलेल्या एका मित्राचा फोन आल्याने ती दुसऱ्या रुममध्ये बोलायला गेली. तिने रुम आतून लॉक केला होता. दिशा जवळपास २० मिनिटं फोनवर बोलल्याची माहिती त्या मित्राने पोलिसांना दिली. थोड्या वेळानंतर रोहन व त्याचे मित्र दिशाला बोलवू लागले. मात्र रुममधून कोणतंच उत्तर न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडल्यानंतर आता दिशा नव्हती. खिडकीतून खाली पाहिले असता इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या पार्किंग परिसरात रक्ताच्या थारोळ्यात दिशा पाहायला मिळाली. तिला शताब्दी रुग्णालयात ताबडतोब दाखल केले असता, तेथे ती मृत घोषित करण्यात आली.

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.