एआयबी शो वादप्रकरणी अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरला कोणताही दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा नकार दिला आहे. याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दोघांनी हायकोर्टात धाव घेतली होती. या वादातील अन्य काहींना आधीच दिलासा देण्यात आला मग आम्हाला का नाही, अशी विनंती या दोघांकडून करण्यात आली. त्यावर यासंदर्भात आम्हाला कोणतीही टिप्पणी करण्यास भाग पाडू नका असं सुतोवाच करत हायकोर्टानं कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

रणवीर आणि अर्जुनच्या प्रकरणाची सुनावणी त्याच विषयाशी संबंधित दाखल केलेल्या एका जनहित याचिकेसोबत घ्यायची की नाही हे निर्देश नसल्यानं मंगळवारी हायकोर्टानं सुनावणी घेण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांना कार्यकारी मुख्य न्यायमूर्तींकडून तसे निर्देश आणण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली.

वाचा : सलमानने घेतला रणवीर सिंगचा धसका?

एआयबी रोस्ट या कार्यक्रमावरून २०१५ साली सुरू झालेले वादळ अद्याप शमलेले नाही. मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये ‘एआयबी’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनी अश्लील शेरेबाजी केल्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. तर मुंबईतील गिरगाव कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश फेब्रुवारी २०१५ मध्ये दिले होते. एआयबी प्रकरणात रणवीर-अर्जुनसोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांचीही नावे आहेत.