‘किंग ऑफ रोमान्स’, ‘बादशाह’, ‘किंग ऑफ बॉलिवूड’, ‘किंग खान’ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानला या इंडस्ट्रीत जवळपास २६ वर्ष पूर्ण झाली. २६ वर्षांच्या या करिअरमध्ये शाहरुखने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. पण सध्या किंग खानची जादू ओसरताना दिसत आहे. कारण बॉक्स ऑफीसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप दहा हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाही. सलमान खान आणि आमिर खानच्या तुलनेत शाहरुखच्या चित्रपटांना आता पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाही हे या यादीतून स्पष्ट होत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ही यादी ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर एस.एस.राजामौली यांचा ‘बाहुबली २’ आहे. तर दुसऱ्या स्थानावर आमिरचा ‘दंगल’, तिसऱ्या स्थानावर रणबीर कपूरचा ‘संजू’ आणि चौथ्या स्थानावर पुन्हा एकदा आमिरचा ‘पीके’ हा चित्रपट आहे. सलमान खानचे ‘टायगर जिंदा है’ ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ हे तीन चित्रपट या यादीत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा ‘पद्मावत’ सातव्या स्थानी आहे. तर विकी कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ने बाजी मारत दहावं स्थान पटकावलं आहे.

वाचा : मलायका-अर्जुनच्या लग्नाबाबत प्रश्न विचारताच अरबाजने दिली ही प्रतिक्रिया

शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर २०० कोटींचा आकडा पार केला होता. पण त्यानंतर त्याच्या चित्रपटांना काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. ‘दिलवाले’, ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झिरो’ या चित्रपटांची कमाई जेमतेम झाली. त्यामुळे किंग खान शाहरूखची बॉक्स ऑफिसवरील जादू ओसरली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.