अभिनेता इरफान खान याचे मुंबईमध्ये निधन झालं. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्याने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. मोठ्या आतड्याला संसर्ग झाल्याने सोमवारी इरफानला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इरफानसारख्या हरहुन्नरी कलाकाराच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांबरोबरच देशातील विविध क्षेत्रामधील दिग्गजांना धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्राबरोबर राजकारण आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वाहिलेली आगळीवेगळी श्रद्धांजली सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे. “साचेबद्ध दिसणे नाही, सिक्स पॅक्स नाही, भन्नाट डान्स स्टेप्स नाहीत, बॉलिवूडमधील घराणेशाही संबंध नाही. फक्त आपल्या अभिनय कौशल्य आणि पडद्यावरील वावर या दोन गोष्टींच्या मिलाफ. बाकी लोकं शांत असताना तुझी बोलण्याची वृत्त ही तुझी सर्वात मोठी संपत्ती होती इरफान खान आणि याच वृत्तीचा आभाव जाणवेल,” अशा शब्दांमध्ये अब्दुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काही तासांमध्ये अडीच हजारहून अधिक फॉलोअर्सने अब्दुल्ला यांचे हे ट्विट रिट्विट केलं आहे तर १७ हजार हून अधिक लोकांनी ते लाईक केलं आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानचा शेवटा चित्रपट ठरला. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार होता  मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला.