काही दिवसांपूर्वी ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांनी धक्कादायक खुलासा केला होता. ज्यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे. तसेच आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही काम देत नाही, असा दावा केला. आता त्यांच्या पाठोपाठ ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रेसुल पूकुट्टी यांनी देखील धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी ए.आर. रेहमान यांच्यासाठी शेखर कपूर यांनी केलेल्या ट्विटला उत्तर दिले आहे.

ए. आर. रेहमान यांच्या ट्विटवर चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विट केले होते. ‘ए.आर. रेहमान तुला खरी समस्या माहिती आहे का? तुला ऑस्कर मिळाला आहे. ऑस्कर मिळणे म्हणजे बॉलिवूडमधील करिअरच्या मरणाला स्पर्श करणे. बॉलिवूड हताळू शकत नाही इतके कौशल्य तुझ्यामध्ये असल्याचा हा पुरावा आहे’ असे ते ट्विटमध्ये म्हटले आहेत. त्यांच्या ट्विटला उत्तर देत रेसुल पूकुट्टी यांनी ट्विट केले आहे.

‘शेखर कपूर मला या संदर्भात विचारा, मी जवळपास हार मानली आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम देत नाही आणि प्रादेशिक सिनेमांनी मला घट्ट पकडले होते. काही प्रोडक्शन हाऊसनी तर त्यांना माझी गरज नसल्याचे सांगितले. तरीही या इंडस्ट्रीवर माझे प्रेम आहे’ असे रेसुल पूकुट्टी यांनी म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा : ए. आर. रेहमान यांच्या ‘इंडस्ट्रीमधील विरोधी गँग’ वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

त्यानंतर त्यांनी आणखी ट्विट केले आहेत. त्या ट्विटमध्ये त्यांनी शेखर कपूर यांनी त्यांना स्वप्न पाहण्यास शिकवले. तसेच ऑस्कर मिळाल्यानंतर ते अगदी सहजपणे हॉलिवूडकडे वळू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही आणि भविष्यातही करणार नाहीत असे देखील म्हटले आहे.

ए.आर, रेहमान आणि रेसुल पूकुट्टी यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी २००९मध्ये ऑस्कर मिळाला होता.

काय म्हणाले होते रेहमान?

हल्ली तुम्ही कमी चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन का करता असा सवाल रेहमान यांना एका मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता. यावर त्यांनी खळबळजनक उत्तर दिले. “मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा हे माझ्याकडे आले होते आणि मी दोन दिवसांमध्ये त्यांना गाणी तयार करून दिली,” असे ते म्हणाले.

“छाब्रा यांनी मला सांगितले की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजले की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत” असे रेहमान पुढे म्हणाले.