बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘जय हो’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसून, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची सुरूवात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने या अपयशाची जबाबदारी सलमान खानने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. या आधी सलमानच्या ‘वॉन्टेड’, ‘बॉडीगार्ड’ आणि ‘दबंग’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरूवात करून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. असे असले तरी ‘जय हो’ हा २०१४ सालातील पहिलाच बिग बजेट चित्रपट तसा करिष्मा करू शकला नाही. सोहेल खान दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १७ कोटींचा गल्ला नोंदवला. एका कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला, चित्रपटाची एकंदर मिळकत महत्वाची असून, या चित्रपटाची एकंदर मिळकत चांगली झाली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगली सुरूवात झाली तर नक्कीच ती एक चांगली बाब असते. परंतु, तसे झाले नाही तर हे अन्य कोणाचे अपयश नसून, माझे स्वत:चे अपयश आहे. कदाचित मी चित्रपट कशासाठी पाहावा, हे प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात अपयशी ठरलो. चित्रपटाच्या कामगिरीविषयी कोणीही अंदाज बांधू शकत नाही. आम्ही एक सुंदर आणि चांगला चित्रपट बनवला आहे. समाजाला चांगला संदेश देणारा हा एक मनोरंजनात्मक अॅक्शनपट आहे. याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, कदाचित प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यात मी अपयशी ठरलो. प्रेक्षकांना ‘दबंग’ आणि ‘बॉडीगार्ड’सारखा चित्रपट पाहण्याची अपेक्षा असल्याने या वेळी आम्ही केलेला वेगळा प्रयोग त्यांना रूचला नाही. त्यांना निखळ मनोरंजन हवे होते. असे असले तरी हा चित्रपट गंभीर स्वरूपातला असल्याचे काही लोकांनी जाणले. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरचे कलेक्शन यांचा ताळमेळ बसत नसल्याने आम्हीसुद्धा गोंधळलो असून, हे समीकरण खरंच विचित्र असल्याचे सलमान म्हणाला.