बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. न्यायालयाने संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. चित्रपट निर्माता शकील नूरानी याला धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात चार वर्षांपूर्वी न्यायालयाने संजय दत्तविरोधात वॉरंट जारी केले होते.
संजय दत्त आणि नूरानी यांच्यातील हा वाद १५ वर्षांपूर्वीचा आहे. २००२ मध्ये शकील नूरानी हे जान की बाजी हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटासाठी त्यांनी अभिनेता संजय दत्त याला ५० लाख रुपये दिले होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अचानक संजय दत्तने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. संजयने चित्रपट अर्ध्यावरच सोडल्याने नूरानी यांना सुमारे पाच कोटींचे नुकसान सोसावे लागले होते. यामुळे नूरानी कमालीचे नाराज होते. यानंतरही शकील यांनी संजय दत्तशी संपर्क साधला होता.
Non bailable warrant issued against Sanjay Dutt over alleged threat to filmmaker Shakil Noorani. (File pic) pic.twitter.com/NrZMwRv78D
— ANI (@ANI_news) April 15, 2017
त्यावेळी संजय दत्तने नूरानी यांना धमकी दिली होती, असा आरोप करण्यात आला होता. नूरानी यांनी संजयविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणी २०१३ मध्ये अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात होते. या प्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. दरम्यान, यावर संजय दत्ततर्फे अद्याप कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2017 8:34 pm