21 January 2018

News Flash

NOOR Movie Review : खऱ्या पत्रकारितेच्या लपंडावात हरवलेला ‘नूर’

‘मुंबई... यू आर किलिंग मी'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 2:38 PM

नूर

‘मुंबई… यू आर किलिंग मी… माझ्याप्रमाणेच तूसुद्धा आतून पोकळ आहेस…’ असं म्हणत ‘नूर’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सबा इम्तेयाज यांच्या ‘कराची- यू आर किलिंग मी’ या पुस्तकावर नूरचे कथानक आधारित आहे. बॉस असूनही त्याप्रमाणे न वागणारा, सतत पाठिंबा देणारा, चांगला मित्र परिवार अशा वातावरणामध्ये स्वच्छंदीपणे वावरणारी नूर म्हणजेच सोनाक्षी सिन्हा चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारत आहे. सोनाक्षी पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार असे वृत्त जेव्हा समोर आले तेव्हापासूनच तिला ही भूमिका साकारणं जमेल का? असाच प्रश्न अनेकांना पडत होता. सोनाक्षीने आजवर साकारलेल्या भूमिका पाहता पत्रकाराची भूमिका तिच्यासाठी थोडी कठीण जाईल असे म्हटले जात होते. पण, नूरच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सोनाक्षीने हे शिवधनुष्य पेलण्याचा चांगला प्रयत्न केला.

हल्लीच्या अतिरंजित पत्रकारितेच्या दिवसांमध्ये ती एक यशस्वी पत्रकार बनू पाहतेय. ज्यामध्ये ती पत्रकारितेची नैतिक मूल्य जपू शकेल. पण, शेवटी ही चित्रपट आहे. त्यामुळे इतक्या सहजासहजी आणि हिरोच्या एन्ट्रीशिवाय नूरचा प्रवास कसा बरा पुढे सरकेल?

‘नूर’… सोनाक्षी सिन्हा, पूरब कोहली, कानन गिल आणि इतर सहकलाकारांच्या साथीने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. ‘नूर’ मस्ट वॉच चित्रपट नसला तरीही तो न पाहण्या इतकाही वाईट नाही. जर का तुम्ही सोनाक्षी सिन्हाचे चाहते असाल तर हा चित्रपट तुम्हाला आवडेलही. कारण, एका पत्रकाराची भूमिका साकारण्यासाठी सोनाक्षीने बरीच मेहनत घेतल्याचे सहज पाहायला मिळतेय. तिचा एकंदर लूकही सर्वांचे लक्ष वेधत आहे. मुळात उगाचच आव आणून चेहऱ्यावरील भाव न खुलवता आणि ओढून ताणून अभिनय न करता तिने ‘नूर’ची व्यक्तीरेखा सहजतेनं निभावली आहे.

चित्रपटाचा पूर्वार्ध प्रेक्षकांवर पकड बनवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. पत्रकारितेकडे गांभीर्याने पाहणारी पण, त्यात अपयशी ठरणारी नूर, तिचा अल्लडपणा आणि त्याभोवती फिरणारं कथानक सारं काही सरळमार्गी जातं. सोपे आणि वास्तवदर्शी वाटणारे संवाद, पूरब कोहली (अयान) आणि सोनाक्षी (नूर) यांची डेट, त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री याचा कथानकाशी चांगला मेळ साधण्यात आला आहे. नूर प्रेम आणि करिअरच्या मागे धावत असताना तिच्या या प्रवासात तिला साथ देण्याची यशस्वी भूमिका शिबानी दांडेकर आणि कानन गिल यांनी साकारली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटामध्ये एका अभिनेत्रीची सरप्राइज एन्ट्रीही पाहायला मिळतेय. ती अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. अशी ही पूर्वार्धात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ‘नूर’ उत्तरार्धात मात्र भरकटताना दिसते.

उत्तरार्धात नूर तिच्या करिअरच्या मार्गावर अगदी योग्य त्या दिशेने जाते. पण मग दिग्दर्शकाची कथानकावर असलेली पकड कुठेतरी सुटताना दिसते. चित्रपटाचे चित्रीकरण आणि लोकेशन्सची निवड करण्यात चूक झाली नाहीये, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे. त्यातही एक पत्रकार म्हणून नूरची धडपड, हल्लीच्या दिवसांमध्ये बातम्यांच्या विषयांची चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी मांडणी, एखाद्या गोष्टीला अवाजवी महत्त्व देत, अतिरंजक पत्रकारितेची नवी शैली आणि त्यात हरवत जाणारा मुख्य मुद्दा हे विषय चित्रपट पाहताना अधोरेखित होतात. मुळात हे मुद्दे याआधीही काही चित्रपटांमधून मांडण्यात आले आहेत. पण, ‘नूर’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावर हलकासा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

चित्रपटाचं संगीत फार प्रभावी नसलं तरीही येत्या काही दिवसांमध्ये ही गाणी बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकायला मिळतील. ‘अकिरा’ चित्रपटापासून सोनाक्षी सिन्हासुद्धा तिच्या भूमिकांमध्ये आणि एकंदर अभिनय शैलीमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना जरी तिच्या अभिनयात काही नाविन्य दिसले नसले तरीही तिच्या चाहत्यांसाठी मात्र या चित्रपटातून सोनाक्षीचा एक नवा पैलू पाहायला मिळतोय.

  • दिग्दर्शक- सुनील सिप्पी
  • निर्माते- भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा
  • कलाकार- सोनाक्षी सिन्हा, पूरब कोहली, कानन गिल, शिबानी दांडेकर, मनिष चौधरी

-सायली पाटील
ट्विटर- @sayalipatil910
sayali.patil@indianexpress.com

First Published on April 21, 2017 1:33 pm

Web Title: noor movie review bollywood actress sonakshi sinha 1st day collection in marathi
  1. No Comments.