चित्रपट :  ‘नूर’

आयुष्य येईल त्या पद्धतीने जगणारी आणि ते कोणापासूनही अगदी स्वत:पासूनही न लपवता खुलेपणाने सांगणाऱ्या ‘नूर’सारख्या सळसळत्या उत्साहाच्या तरुणीकडून चित्रपटाची कथा उलगडत जाणे ही सुखद सुरुवातच. मुळात या चित्रपटाला ताजेपणा देते. ‘नूर’ व्यवसायाने पत्रकार आहे. त्यामुळे तिच्या आयुष्याची कथा म्हणजे पर्यायाने तिच्या व्यवसायाची म्हणजेच पत्रकारितेची गोष्ट चित्रपटात महत्त्वाची असली पाहिजे हे साहजिक आहे. आणि नेमका इथेच या चित्रपटाचा ‘नूर’ चुकीचा ठरला आहे. कुठल्याही क्षेत्रात आल्यानंतर कामाबद्दल असलेली आदर्श तत्त्वं आणि प्रत्यक्षात पदरी पडलेले काम यात तफावत असते. काळाच्या ओघात आपण तत्त्वालाच धरून राहायचे की मला इथे नेमके काय करायचे आहे याची सातत्याने चाचपणी करत त्या दिशेने वाटचालीचे प्रयत्न करायचे, हे द्वंद्व जवळपास प्रत्येक व्यवसायात अनुभवायला मिळते. पत्रकारितेत तुलनेने हे द्वंद्व जास्त आहे. ज्यावर अचूकपणे बोट ठेवणारा दिग्दर्शक चित्रपटात या क्षेत्राची मांडणी करताना मात्र फसला आहे..

नूरच्या तोंडूनच चित्रपटाची कथा उलगडत असल्याने साहजिकच तिचं पत्रकार म्हणून लोकांसमोर असणं, तिला लोकांशी संबंधितच कथा करण्यात असलेला रस आणि सर्वसामान्यांचे आयुष्य पणाला लागले असताना त्याच्याकडे कानाडोळा करत सनी लिओनच्या मुलाखतीवर भर द्यायला लावून कळत-नकळत नूरसारख्या उत्साही पत्रकाराचे केले जाणारे मानसिक खच्चीकरण या गोष्टी पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. आपल्याला काय करायचे आहे आणि आपण काय करतो आहोत, याचा ताळमेळ न लागलेले ‘नूर’सारखे अनेक तरुण पत्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे नूर सांगत असलेली तिची गोष्ट बऱ्याच अंशी खरी असली, तरी पत्रकारितेच्या क्षेत्राचे ज्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे ते मात्र सपशेल चुकीचे आहे.

नूर आपल्याला सांगते की ती वाहिन्यांना बातम्या पुरवणाऱ्या कोण्या एका ‘बझ’ नामक न्यूज एजन्सीमध्ये आहे. पण तरीही ही एजन्सी कुठल्या प्रकारच्या बातम्यांवर काम करते, नूरचा संपादक शेखर हा एकेकाळी युद्धाचे वार्ताकन करणारा पत्रकार होता मात्र लग्नानंतर त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तो एका न्यूज एजन्सीचा मालक आहे, जिथे स्थानिक पातळीवरच्या वाचकप्रिय कथांना प्राधान्य दिले जाते. त्यावरून नूरचे त्याच्याशी कायम खटके उडतात. नूरला कुठलीही डेडलाइन नाही, दिवसभरातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेणारी न्यूजरूम नाही. केवळ नूर आणि तिचे संपादक  शेखर या दोघांवरच पत्रकारितेचा उभा केलेला डोलारा मुळातच तकलादू आहे. त्यातून मग अयान सारख्या सीएनएन या प्रतिष्ठित वाहिनीच्या युद्धपत्रकाराचे येणे, त्याचवेळी नूरला तिच्या आयुष्यात पहिल्यांदा ब्रेकिंग स्टोरीची आलेली संधी आणि मग कथेला मिळालेले वळण हे अपेक्षितपणे येते. त्याऐवजी युद्धाचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांचा दृष्टिकोन, काही काळानंतर त्यांच्या मानसिकतेत होणारे बदल आणि अयानमुळे नूरचे या व्यवसायाशी असलेले नाते अधिक प्रगल्भपणे रंगवत ही कथा वेगळ्या उंचीवर नेता आली असती. मात्र दिग्दर्शक सुनील सिप्पी यांनी कथेवर काम करताना या क्षेत्राचा वरवर अभ्यास केला असल्याने काही एक गोष्टी वगळता अतिशय ठोकळेबाजपणे नूरची पत्रकारिताही या चित्रपटात पाहायला मिळते. ‘ब्रेकिंग’च्या मागे लागताना कोणासाठी या क थाव्यथा लोकांसमोर आणायच्या याचे भानच नसणे हेही पत्रकारितेतील वास्तव आहे. हा विषय चित्रपटात आला हे महत्त्वाचे असले तरी तो तितक्या सविस्तरपणे पुढे जात नाही किंबहुना तो नूरच्या वैयक्तिक आयुष्यात अडकून पडतो, हे दुर्दैव आहे.

नूरची पत्रकारिता आणि तिचे वैयक्तिक आयुष्य दोन समांतर कथा चित्रपटात सुरू राहतात. स्वत: नूरच ते सांगत असल्याने तिच्या आयुष्यातल्या घडामोडी प्रत्यक्ष अनुभवत तिचा स्वत:शी सुरू असलेला संवाद ऐकण्याचा हा खेळ प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवतो. इथे नूर कुठलीच भावना लपवत नाही, तिला आवडणाऱ्या पुरुषांबद्दलही ती मोकळेपणाने बोलते, लहानपणापासून गट्टी असलेली तिची मैत्रीण झारा (शिवानी दांडेकर) आणि साद (कानन गिल) या दोघींबरोबरची नूरची मैत्री हा भागही चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. मात्र समाजमाध्यमाचा आधार घेत इतक्या झटकन नूरचा बदललेला जीनवप्रवाह ही गोष्ट पचवणे जड वाटते. नूर म्हणजे सोनाक्षीच इतक्या सहजपणे तिने ही भूमिका रंगवली आहे. सोनाक्षीच काय पूरब कोहली, शिबानी दांडेकर, कानन गिल, एम. के. रैना, स्मिता तांबे या सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. नूरच्या व्यक्तिचित्रणाबरोबरच या कथेचा भाग असलेल्या मुंबई शहराचे वेगळे चित्रण आणि कथामांडणीची शैली यामुळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षक सुखावतो यात शंका नाही.. पण अजून खूप काही चांगले पाहता आले असते हा विचारही मनाला तितकाच छळतो!

’ दिग्दर्शन – सुनील सिप्पी

’  कलाकार सोनाक्षी सिन्हा, पूरब कोहली, शिबानी दांडेकर, कानन गिल, एम. के. रैना, स्मिता तांबे आणि मनीष चौधरी.