प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमधला हा व्हिडीओ असून त्याच्यावर सहकलाकार नोरा फतेहीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी टेरेन्सवर टीका केली आहे. त्यानंतर आता नोरा फतेहीने टेरेन्सची बाजू घेत नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

काय आहे प्रकरण?

‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोमधील परीक्षक मलायका अरोरा हिला करोनाची लागण झाल्याने तिच्या जागी काही दिवसांसाठी डान्सर व अभिनेत्री नोरा फतेहीला परीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमधील टेरेन्स आणि नोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत टेरेन्स नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ खरा आहे की मॉर्फ केलेला किंवा एडिट केलेला आहे याची खात्री होऊ शकली नाही.

ट्रोल झाल्यानंतर टेरेन्सची पोस्ट

सोशल मीडियावरून टेरेन्सवर टीकांचा भडीमार होत असताना त्याने इन्स्टाग्रामवर नोरासोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याने नोराला उचलून घेतलं असून त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने एका साधूची गोष्ट लिहिली आहे. नदी पार करता न येणाऱ्या एका महिलेला साधू उचलून घेऊन नदीच्या दुसऱ्या किनारी सोडतो. त्यावर दुसरा साधू त्यांना विचारतो, “तुम्हीच सांगितलं की स्त्रीला कधी स्पर्श करायचा नाही आणि आता तुम्हीच तिला उचलून नदीच्या दुसऱ्या किनारी सोडलात?” त्यावर शांतपणे पहिला साधू उत्तर देतो, “मी तिला कधीच नदीच्या दुसऱ्या काठावर सोडलं आहे. पण तू अजूनही तिचा भार उचलतोय असं वाटतंय.” माझ्यावर विश्वास केल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत टेरेन्सने नोराचे आभारदेखील मानले.

https://www.instagram.com/p/CFoQZFlHseG/

नोराने नेटकऱ्यांना सुनावले

टेरेन्सच्या या पोस्टवर नोराने उत्तर दिलं. “धन्यवाद टेरेन्स! मॉर्फ केलेले, फोटोशॉप केलेले फोटो आणि व्हिडीओ सध्याच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट होत असताना, त्या गोष्टींचा तू स्वत:वर परिणाम होऊ दिला नाहीस हे पाहून बरं वाटलं. तू अत्यंत शांतपणे सगळं हाताळलंस. ही वेळसुद्धा निघून जाईल. गीता मॅडम आणि तू माझ्यासोबत अत्यंत आदरपूर्वक वागलात. मला परीक्षक म्हणून स्वीकारलंत. या शोमधून मला खूप काही शिकायला मिळालं”, असं नोराने म्हटलं.