बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आदित्य चोप्रा अभिनयातले दोन हुकुमी एक्के अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना घेऊन ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच बिग बी आणि मिस्टर परफेक्शनिस्ट एकत्र काम करणार आहेत. मात्र, या चित्रपटाल्या अभिनेत्रीवरुन आमिर आणि आदित्य यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आदित्यला या चित्रपटाची अभिनेत्री वाणी कपूर असावी असे वाटत होते. तर आमिरने मात्र आलिया भट्ट हिला पसंती दिली होती. खरंतर आदित्यच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटामध्ये वाणीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आदित्यने स्वतःच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटातही तिच असावी असे त्याला वाटते. तर दुसरीकडे, आमिरला मात्र या चित्रपटात आलिया भट्ट असावी असेच वाटते. अभिनेत्रींवरुन झालेले त्यांचे हे भांडण एवढ्यापर्यंत पोहोचले आहे की, कदाचित या चित्रपटातून आमिर खान बाहेरही पडू शकतो असे म्हटले जात होते. पण, आता या संपूर्ण वादावर पूर्णविराम लागला आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि आलिया भट्ट या दोघींच्याही नावांवर काट मारण्यात आल्याचे कळते.

फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोडून टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीची चित्रपटासाठी निवड करण्यात आल्याचे कळते. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर ही आमिरसोबत काम करताना दिसण्याची शक्यता आहे. आलियाचे २०१७ चे वेळापत्रक कामाने भरलेय आणि वाणीच्या अभिनयाने आमिरवर काही चांगली छाप पाडलेली नाही. त्यामुळे, मृणालने यशस्वी स्क्रिन टेस्ट दिल्याने तिची निवड करण्यात आल्याचे कळते. मृणालने ‘सुराज्य’ आणि ‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच, तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘मुझसे कुछ केहती.. ये खामोशिया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BNUjNLngUP9/

https://www.instagram.com/p/BNMXfEdAwY1/

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘धूम ३’चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य करणार आहेत. तुर्तास, सध्या चर्चेत असलेल्या ‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

https://www.instagram.com/p/BMteJu2APQO/

https://www.instagram.com/p/BMq0VHLgqp2/