‘पेज ३’, ‘ओमकारा’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटामधून आपलं अभिनय कौशल्य दाखविणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन. आज कोंकणाचा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘ए जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून तिने खऱ्या अर्थाने कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिने ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’ या चित्रपटातून साऱ्याचं लक्ष वेधलं. त्यानंतर तिचा प्रत्येक चित्रपट लोकप्रिय झाला. विशेष म्हणजे आज यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंकणाला खरंतर अभिनेत्री होण्यापेक्षा सेक्रेटरी होण्याची इच्छा होती. एका मुलाखतीमध्ये तिने तिची ही इच्छा व्यक्तही करुन दाखविली.

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका अपर्णा सेन यांची लेक असलेल्या कोंकणाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी तिने त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये, ‘जर आज अभिनेत्री नसतीस, तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतसं?’ असा प्रश्न कोंकणाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत, “मी एक उत्तम सेक्रेटरी असते”, असं कोंकणा म्हणाली. तसंच तिने तिच्या आईविषयी आणि मुलाविषयीदेखील अनेक गोष्टी सांगितल्या.

दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या कोंकणाला ‘मिस्टर अँण्ड मिसेस अय्यर’साठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यानंतर कोंकणा २००५ साली ‘पेज थ्री’ चित्रपटात चमकली. या चित्रपटामुळे तिची हिंदी चित्रपट वर्तुळात ओळख निर्माण झाली. या दरम्यान तिने ‘वेक अप सिड’ चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स केला. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोंकणाने मिळवला आहे. २००६ साली ‘ओंकारा ‘आणि २००७ साली ‘लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटांसाठी कोंकणाला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. सहाय्यक अभिनेत्रीचा कोंकणाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोंकणा सेन ही अतिशय सिलेक्टेड चित्रपटातून आपल्याला दिसली आहे.