चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या चित्रपटापेक्षाही दुसरा कोणता मुद्दा जास्त प्रकाशझोतात असेल, तर तो आहे त्यांच्या मानधनाचा. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत समाधानकारक मानधन मिळत नाही अशी तक्रार आजवर बऱ्याच जणांनी केली. मानधनाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आला तो ‘पद्मावत’ या चित्रपटाच्यावेळी. कारण या चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि रणवीर सिंगपेक्षा जास्त मानधन दीपिकाने मागितलं होतं. दीपिकाला या दोघांपेक्षा अधिक मानधन मिळालंसुद्धा होतं. पण आता बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात कंगना रणौतने दीपिकाला या स्पर्धेत मागे टाकलं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी येणारं नाव होतं अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचं. पण आता तिची जागा कंगनाने घेतली आहे. कंगनाने आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बायोपिकसाठी १४ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. ही रक्कम तिच्या नेहमीच्या मानधनापेक्षा दुप्पट असल्याचं म्हटलं जात आहे. कंगना याआधी साधारणपणे पाच ते सहा कोटी रुपये मानधन स्विकारत होती.

वाचा : अरबाज खान म्हणतो, ‘होय मी डेट करतोय पण..’ 

दीपिकाच्या चित्रपटांचा आढावा घेतला तर, जवळपास तिच्या सात चित्रपटांनी १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. त्याशिवाय दीपिका एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या चित्रपटाने ३०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडला होता. पण आता मानधनाच्या बाबतीत ‘क्वीन’ कंगनाने बाजी मारली आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे. चित्रपट तिच्या भूमिकेवर सर्वार्थाने अवलंबून असल्याने तिने घेतलेलं मानधन योग्य असल्याचं म्हटलं जात आहे. बऱ्याच अडचणींनंतर हा बहुप्रतिक्षित चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.