कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद अधिकाधिक चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या शोमधून कपिल प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यास सज्ज झाला आहे. मात्र आधीच्या शोमधला सहकलाकार सुनील ग्रोवर याच्याशी झालेला त्याचा वाद अजूनही मिटलेला नाही. दोघांमध्ये ट्विटरवर जोरदार बाचाबाची झाली. कपिलने मला खोटारडा म्हटल्याचे वाईट वाटले नाही पण त्याच्या तब्येतीची काळजी असल्याचे सुनीलने म्हटले.

कपिल- सुनीलचा वाद ट्विटरवर सुरु होण्याचं कारण म्हणजे एका चाहत्याने सुनीलला विचारलेला प्रश्न. कपिलच्या नव्या शोमध्ये तू सहभागी होणार का असा प्रश्न एकाने सुनीलला ट्विटरवर विचारले. त्यावर मी फोनकॉलची बरीच प्रतीक्षा केली पण मला कोणीच विचारले नाही, असं उत्तर सुनीलनं दिलं. हे उत्तर पाहून कपिलचा पारा चढला. सुनील साफ खोटं बोलत असून अफवा पसरवत आहे, असं ट्विट कपिलने केलं.

वाचा : कलेच्या वेडापायी खाकीला रामराम

यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला की, ‘मी खोटारडा असल्याचं त्याने म्हटलं. मला त्याचे वाईट वाटले नाही. मला त्याच्या तब्येतीची काळजी आहे. कारण त्याने केलेल्या ट्विट्सची वेळ तुम्ही तपासून पाहा. त्याच्या ऐकवण्याचं मला दु:ख नाही. त्याची प्रकृती कायम उत्तम राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.’

PHOTOS: आणखी एका अभिनेत्रीचे शुभमंगल

मी कायम कपिलचा आभारी राहणार असल्याचेही सुनीलने या मुलाखतीत म्हटले. त्यामुळे हा वाद मिटावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्याने दाखवून दिलं. मात्र, यावर कपिलचं काय म्हणणं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.