उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देत भारताने सर्जिकल स्ट्राइक घडवून आणले. तसेच उरी हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आपल्या देशाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने एक पाऊल पुढे टाकत पाकिस्तानी व्यक्तिरेखा साकारण्यास नकार दिल्याचे कळते. दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांसाठी भारतीय चित्रपट सृष्टीचे दरवाजे बंद झाले आहेत. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)ने आपल्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तान कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानी लेखक सबा इम्तियाझ यांच्या ‘कराची, यू आर किलिंग मी’ या पुस्तकावर आधारित ‘नूर’ चित्रपटात सोनाक्षी पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. ‘फोर्स २’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान सोनाक्षीला ‘नूर’ चित्रपटातील भूमिकेविषयी विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, भूमिकेविषयी मी इतकचं सांगेन की, चित्रपटात मी पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका साकारत नाहीये. हा चित्रपट एका पाकिस्तानी लेखकाने लिहलेल्या पुस्तकावर असून त्याची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात पूरब कोहली, शिबानी दांडेकर, कनन गिल यांच्याही भूमिका आहेत. ‘नूर’ चित्रपट पुढील वर्षी ७ एप्रिलला प्रदर्शित होईल. याव्यतिरीक्त सोनाक्षीचा अॅक्शन अवतार पुन्हा एकदा फोर्स २ चित्रपटात पाहावयास मिळेल. त्यामुळे तुला आता ‘अॅक्शन क्वीन’ असा टॅग दिला तर तो चुकीचा ठरणार नाही, असे विचारले असता सोनाक्षी म्हणाली, हो नक्कीच. मला अॅक्शनपटांची फार आवड आहे. त्यामुळेच मी याआधीही ब-याच अॅक्शनपटांमध्ये काम केले होते. या शैलीतील चित्रपट पाहायला मला आवडतात. मला ‘अकिरा’मध्ये अॅक्शन सिक्वेन्स करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा मी ‘फोर्स २’ मध्ये अॅक्शन सीन करत आहे. ‘अॅक्शन क्वीन’ हा माझा टॅग टिकून राहण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असेही सोनाक्षी म्हणाली. अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स २’ चित्रपटात जॉन अब्राहम हादेखील मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होईल.