सध्याच्या बायोपिकच्या ट्रेण्डमध्ये सर्वाधिक चर्चा पाहायला मिळत आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या ‘संजू’ची. संजय दत्तच्या जीवनावर आधारित या चित्रपटात संजूबाबाच्या भूमिकेतला रणबीर सर्वांनाच भावला. ट्रेलरमधील रणबीरचा लूक आणि त्याचं दमदार अभिनय पाहून अनेकांनी प्रशंसा केली. किंबहुना रणबीरशिवाय दुसरा कोणताच अभिनेता ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकत नाही असंच अनेकांचं मत आहे. मात्र, संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीरच्या आधी रणवीर सिंगचा विचार केला गेला होता. निर्माते विदू विनोद चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब सांगितली.

‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत विदू विनोद चोप्रा म्हणाला की, ‘संजयच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानीने सर्वप्रथम रणबीर कपूरचं नाव घेतलं. पण मी फारसा खूश नव्हतो. रणवीर सिंगसारखा एखादा दुसरा अभिनेता ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकेल असं मला वाटलं. प्रेक्षकांना आकर्षित करण्याची, स्वत:ला भूमिकेत झोकून देण्याची क्षमता रणवीरमध्ये आहे. पण रणबीरसाठी राजू अडून बसला होता. अखेर जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा राजूचं म्हणणं योग्य ठरल्याचं मला दिसत होतं. संजयच्या भूमिकेत रणबीरने स्वत: पूर्णपणे झोकून दिलं हे मी आता ठामपणे म्हणू शकतो.’

वाचा : ‘ड्राय डे’ घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल 

रणबीरसोबतच या चित्रपटात परेश रावल, मनिषा कोईराला, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.