‘पद्मावती’ या चित्रपटाविषयीचे कितीही वाद चर्चेत असले तरीही चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांना आतापासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राणी पद्मावती, महारावल रतन सिंग आणि अलाउद्दीन खिल्जी ही पात्रं कलाकारांनी त्याच ताकदीने रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांनी साकारलेल्या या भूमिकांबद्दल त्यांची प्रशंसाही करण्यात आली. या साऱ्यामध्ये लक्षवेधी ठरला तो म्हणजे अभिनेता रणवीर सिंग.

भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटात रणवीर क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या रुपात झळकणार आहे. त्याचा लूक पाहून अनेकांनी त्याची प्रशंसा केली. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निमित्ताने रणवीरला भन्साळींसोबत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली. पण, अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर भन्साळींची पहिली पसंती नव्हता. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सर्वप्रथम अजय देवगणला अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात आले होते.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या

अजयने यापूर्वी भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले होते. अजयच्या कामाची पद्धत आणि त्याची अभिनय शैली या सर्व गोष्टींचा भन्साळींना अनुभव होता. त्यामुळेच त्यांनी अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव त्याचापुढे ठेवला होता. किंबहुना या दोघांमध्ये भूमिकेविषयी चर्चाही झाल्या होत्या. पण, चित्रीकरणासाठीचा प्रदीर्घ कालावधी आणि चित्रीकरणाच्या तारखांचे कारण देत अजयने भन्साळींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधून काढता पाय घेतला. त्यामुळे रणवीरला अलाउद्दीन खिल्जी साकारण्याची संधी मिळाली. तेव्हा आता रणवीरने या संधीचा पुरेपूर वपर करत खिल्जीच्या पात्राला न्याय दिला आहे की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.