08 March 2021

News Flash

टीका करणे ही ‘फॅशन’च झालीय..

बॉलीवूडची कलाकार असणं किंवा सेलिब्रिटी म्हणून वावरणं आपल्या समाजात सोपी गोष्ट नाही.

| June 7, 2015 02:04 am

बॉलीवूडची कलाकार असणं किंवा सेलिब्रिटी म्हणून वावरणं आपल्या समाजात सोपी गोष्ट नाही. कलाकारांना आपलं असं स्वत:चं डोकं नसतं, त्यांना त्यांचे विचार नसतात. ते कधीच चूक  करू शकत नाहीत. त्यांची मतं विचारात घेणं गरजेचं नसतं, असे काही ठोकताळे लोकांच्या मनात घर करून आहेत. कोणीही उठतो आणि आपल्यावर टीका करत सुटतो. सोशल मीडियाने तर यासाठी लोकांच्या हातात आयतं शस्त्र उपलब्ध करून दिलं आहे, अशा शब्दांत विद्या बालनने आपल्यावर उगीचच टीका करणा–ऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. फॅशनच्या नावाखाली अनेकांनी आपल्याला उगीचच टीकेचे धनी केल्याचे अनेक अनुभव गाठीशी असल्याचे विद्या म्हणते.

गेल्या वर्षांत ‘बॉबी जासूस’ आणि ‘शादी के साईड इफेक्ट्स’सारख्या चित्रपटांनी अपयश अनुभवल्यानंतर विद्या बालनमधील अभिनेत्री नाही म्हटली तरी धास्तावली आहे. ‘बॉबी जासूस’ हा खरोखर एक चांगला चित्रपट होता. एक वेगळा प्रयोग होता. तो लोकांना का आवडला नाही, हा एक  प्रश्न आहेच. ‘शादी के साईड इफेक्ट्स’चाही विषय तितकाच वेगळा होता. चित्रपट चालले नाहीत मग आता काय होणार? ही भीती या वळणावर अभिनेत्री म्हणून नाही. पण चित्रपट नुसते चांगले असून चालत नाहीत. त्यांनी तिकीटबारीवर कमाई करणं हे महत्त्वाचं आहे तरच तुमचं अर्थकारण बिघडत नाही. त्यामुळे सातत्याने अपयश आल्यानंतर थोडं थांबून काही वेगळा विचार करणं आपल्याला आवडतं, असं विद्या सांगते.

विद्या बालनने ‘साडी’ला फॅशन रॅम्पवर एक नवा लौकिक मिळवून दिला, असं म्हटलं जातं. साडी हा माझ्या दृष्टीने सगळ्यात आरामदायी असा भारतीय पेहराव आहे. मी साडीत गल्लीतून दिल्लीपर्यंत कुठेही छान, मोकळेपणे वावरू शकते. त्यामुळे फॅशन रॅम्पवरही साडीलाच माझी पसंती होती, असं विद्या म्हणते. मात्र फॅ शनच्या नावाखाली आपल्यावर झालेली टीका अनाठायी आहे, असं ती म्हणते. मध्यंतरी, एका फॅ शन ब्लॉगसाठी लिहिणाऱ्या दोन मुली माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनी माझ्याशी खूप छान गप्पा मारल्या. मला फॅ शनची जाण आहे याचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. त्या गेल्या आणि त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याविषयी लिहिलं. पण याच दोन मुलींनी मला भेटण्याआधीच आपापल्या ब्लॉगवर माझ्या फॅ शनविषयी नाही नाही ती टीका केली होती. असे अनेक अनुभव माझ्याकडे आहेत. एखाद्याला भेटल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही त्याला गृहीत धरून टीका कशी करू शकता? असा प्रश्न विद्या विचारते. मात्र हे आजच्या सोशल मीडियामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग आहे आणि म्हणूनच ती सोशल मीडियापासून दूर राहात असल्याचं तिने सांगितलं.

विद्या बालन यावर्षी एकाच चित्रपटानंतर अर्धविराम घेणार आहे. महेश भट्ट यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि मोहित सुरी दिग्दर्शित करत असलेल्या ‘हमारी अधुरी कहानी’ चित्रपटात विद्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. महेश भट्ट यांच्या चित्रपटाची नायिका होण्याची संधीही नव्या पिढीत तिच्याच वाटय़ाला आल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. महेश भट्ट यांची कथा सरळसाधी नसते. समाजाचा एक पैलू त्या कथेत असतो. पुन्हा भट्ट साहेबांच्या चित्रपटातील नायिका नेहमीच हटके आणि स्वतंत्र बाण्याची अशी राहिलेली आहे. दोन जीव जेव्हा एकत्र येतात ते मग विवाहबंधनामुळे एकत्र येत असतील किंवा प्रेमात एकत्र येत असतील. एकत्र आल्यानंतर ते जेव्हा एकमेकांवर हक्क गाजवायला लागतात तेव्हा या नात्यातील विसंवादाला सुरुवात होते. वसुधाची भूमिका योग्य वेळी आपल्याला मिळाली आहे असं विद्याला वाटतं. कारण स्वत: वैवाहिक जीवन अनुभवत असल्याने पती-पत्नीच्या नात्यातून निर्माण होणारा हा ‘हक्क’ नावाचा ताण आता मी ओळखायला शिकले आहे. तो ताण वसुधाच्या नात्यात आहे. लग्नानंतरच स्त्री आपली ओळख विसरते असं म्हणण्यात तथ्य नाही. अगदी पहिल्या प्रेमात पडल्यानंतरही त्या हळूहळू आपलं अस्तित्व, आपली ओळख हरवून बसतात, हे वास्तव आहे असं ती म्हणते. ‘हमारी अधुरी कहानी’ पाहताना या नात्याची वीण अनुभवता येईल आणि म्हणूनच हा महेश भट्ट यांचा वेगळा चित्रपट आहे, असं तिला वाटतं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन कुठलाच चित्रपट अजून स्वीकारलेला नाही अशी माहिती तिने दिली.

यावर्षी छोटय़ा पडद्यावर एक टॉक शो करण्याची माझी इच्छा होती. गेले अनेक दिवस या शोची संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती. पण एकापाठोपाठ एक चित्रपटांचे चित्रीकरण असल्याने त्या संकल्पनेवर काम करायला वेळ मिळाला नव्हता. म्हणून एकेक चित्रपट संपवून आता पूर्ण लक्ष या टॉक शोवर केंद्रित केलं आहे, असं विद्या सांगते. सध्या टॉक शोबद्दल वाहिनीशी चर्चा सुरू आहे. बोलणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर निश्चित स्वरूपात नवा अवतार जाहीर करण्यात मजा येईल, असं विद्या म्हणते. तोपर्यंत, ‘हमारी अधुरी कहानी’ आहे. शिवाय, तिच्या फॅ शनविषयीची जोरदार चर्चाही काही न करता सुरू राहीलच, असं ती गमतीने म्हणते. विद्या बालन केवळ सब्यसाचीच्याच साडय़ा परिधान करते, अशीही टीका तिच्यावर होत होती. पण ते खरं होतं असं सांगणाऱ्या विद्याने गेली दोन र्वष आपण वेगवेगळ्या फॅ शन डिझायनर्सनाही शोधून काढल्याचं सांगितलं. गौरांग शहा, श्रुती संचेती, अ‍ॅनाबेला मिश्रा यांच्यासारखी मंडळी आहेत. हे सगळेजण खादीच्या कपडय़ांवर काम करतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर नवीन काही शोधायला आवडतं. पण सब्यसाचीच्या कपडय़ांवरचं प्रेम कायम राहील, असं विद्या सांगते.

‘कहानी’चा सिक्वल विद्या बालनने का नाकारला? हा प्रश्न तिच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. पण ‘कहानी’च्या सिक्वलविषयी आपल्याला कधी विचारणा झालीच नव्हती, असं विद्याने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 2:04 am

Web Title: now a days criticism has become a fashion says vidya balan
टॅग : Fashion,Vidya Balan
Next Stories
1 शाहरुख आणि भन्साळींच्या चित्रपटात स्वप्निल हीरो!
2 लैंगिकतेपलीकडचा..
3 मालिकांचा ‘कपडेपट’ हरवला!
Just Now!
X