बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बिहारच्या पूर्णियामधील रस्त्याला व चौकाला सुशांतचे नाव देण्यात आले आहे. आता मुंबईमधील एका रस्त्याला सुशांत सिंह राजपूत नाव देण्यात यावे अशी मागणी मुंबई महानगरपालिका आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे केली जात आहे.

सुशांतचा फॅमिली फ्रेंड निलोत्पल मृणालने सुशांत राहत असलेल्या वांद्रे येथील जोगर्स पार्क भागाला सुशांतचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात निलोत्पलने ‘मिड डे’ला मुलाखत दिली. ‘सुशांतच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले. सुशांतच्या घराजवळील रस्त्याला त्याचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली गेली आहे. मी सर्वात पहिले आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी संपर्क साधला’ असे त्याने म्हटले.

‘रस्त्यासोबतच एखादे गार्डन किंवा एखाद्या चौकाला देखील सुशांतचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी केली आहे. पण सध्या करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी लढा देण्यात महानगपालिका व्यग्र आहे. ते याकडे लवकरात लवकर पाहतील’ असे त्याने पुढे म्हटले आहे.

यापूर्वी बिहारच्या पूर्णियामधील रस्त्याला व चौकाला सुशांतचे नाव देण्यात आले आहे. महापौर सविता सिंह यांनी नगरपालिकेकडून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आणि फोर्ड कंपनी चौकाचे नाव बदलून सुशांत सिंह राजपूत चौक नाव देण्यात आले. तर मधुबनी चौकातून माता चौककडे जाणाऱ्या रस्त्याला सुशांत सिंह राजपूत पथ असे नाव देण्यात आले आहे.

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांत संदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास २८ जणांचा जबाब नोंदविला आहे.