16 February 2019

News Flash

‘न्यूड’ सत्य

हा बहुचर्चित चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने..

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन ‘न्यूड’ चित्रपटाने होणार होते. मात्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या विषयावर बरीच चर्चा, वाद झाले. रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या चित्रपटाचा विषय ‘न्यूड मॉडेल’ असा असून हा बहुचर्चित चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने..

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमावर आपल्या आगामी ‘न्यूड’ चित्रपटाचे पोस्टर टाकले आणि चर्चेला सुरुवात झाली. चित्रपटाच्या नावावरून काहींच्या भुवया उंचावल्या तर चित्रपटात नेमके काय असणार याबाबत काहींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन ‘न्यूड’ चित्रपटाने होणार होते. पण नंतर हा चित्रपट दाखवण्यात येणार नसल्याचे सांगितले गेले आणि त्याचे बरेवाईट पडसाद चित्रपटसृष्टीत उमटले.

म्हटले तर हा विषय नवा नाही. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि चित्रकला विषयाशी संबंधित सर्वाना ‘न्यूड मॉडेल’विषयी माहिती आहे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणून ‘न्यूड चित्रकारिता’ करावी लागते आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्षात खरोखरच न्यूड मॉडेल बसतात. न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी तो त्यांच्या कामाचा एक भाग असतो. रवी जाधव हे स्वत: ‘जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट’चे विद्यार्थी. फाइन आर्ट शाखेत असणाऱ्या त्यांच्या मित्रांकडून न्यूड मॉडेलविषयी त्यांना माहिती कळली होती. तेव्हापासूनच रवी जाधव यांच्या मनात या न्यूड मॉडेल आणि त्यांच्या कामाविषयी एक कुतूहल निर्माण झाले. या महिला घरी आपण कुठे आणि काय काम करतो हे सांगत असतील का? त्यांच्या घरच्यांना त्या काय काम करतात हे कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? हे काम त्या स्वत: आवडीने करत असतील? की त्यामागे काही वेगळा उद्देश असेल?, अशा अनेक प्रश्नांनी जाधव यांच्या मनात तेव्हापासूनच घर केले होते.‘न्यूड मॉडेल’ हा विषय तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात घोळत होता. हा विषय धाडसी आणि वेगळा असल्याने चित्रपट दिग्दर्शकीय कारकीर्दीची सुरुवात अशा विषयावर करणे धाडसाचे होते. रवी जाधव यांनी सुरुवातीला वेगळ्या विषयावरील (नटरंग, बालक पालक, बालगंधर्व ) चित्रपट केले आणि त्यांना रसिक प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे चित्रपट यशस्वी झाले आणि रवी जाधव यांनी आपल्या नावाची स्वतंत्र नाममुद्रा मराठी चित्रपटसृष्टीवर उमटवली. या सर्व यशस्वी चित्रपटांनंतर जाधव यांनी ‘न्यूड’चे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. हा धाडसी विषय निवडल्यानंतर जाधव यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला, त्यावर संशोधन केले. जे. जे. कला महाविद्यालयातील प्राध्यापक अनिल नाईक सर यांच्याशी चर्चा केली. ‘चिन्ह’ मासिकाने या विषयावर जो विशेषांक काढला होता, त्याचे वाचन केले. या विषयावरील भारतीय आणि परदेशात तयार झालेले लघुपट, माहितीपट पाहिले. त्यानंतर २०१५ मध्ये जे. जे. कला महाविद्यालयात गेली अनेक वर्षे न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या दोन न्यूड मॉडेल्सशी चर्चा केली. त्यांच्या दीर्घ मुलाखतीमधून त्या दोघींच्या कामाचे स्वरूप, हे काम त्यांनी का आणि कसे निवडले, घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, या कामाविषयी त्यांना काय वाटते याची माहिती मिळाली. जे. जे.मध्येच शिक्षण झाले असल्याने, तसेच गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्याने तो अनुभवही पाठीशी होता. चित्रपटाची कथा स्वत: रवी जाधव यांनीच लिहिली. पण पटकथा आणि संवादासाठी वेगळी व्यक्ती असावी म्हणून त्यांनी सचिन कुंडलकर यांची निवड केली आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.

चित्रपटाचे नाव ‘न्यूड’ हेच ठेवायचे की बदलायचे?, असा प्रश्न जाधव यांना पडला होता. भारतात किंवा परदेशातही जेवढी म्हणून कला महाविद्यालये आहेत, या विषयावरील शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, माहितीपट या सगळ्यात ‘न्यूड मॉडेल’ हाच शब्दप्रयोग केला असल्याचे दिसून आले त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘न्यूड’ हेच ठेवायचे त्यांनी नक्की केले. चित्रपटातील ‘यमुना’ आणि ‘चंद्राक्का’ या दोन मुख्य भूमिकांसाठी त्यांनी अनुक्रमे अभिनेत्री कल्याणी मुळे आणि छाया कदम यांची निवड केली. या दोघींबरोबर चर्चा, कार्यशाळा, जे.जे. कला महाविद्यालयात न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या दोघी जणींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, जे. जे. कला महाविद्यालयात या विषयावरील सुरू असलेले काम कल्याणी आणि  छाया यांना दाखविण्यात आले. या सगळ्याची चित्रपटातील त्या भूमिका साकारण्यासाठी दोघींनाही मदत झाली. परिनिरीक्षण मंडळाकडून पहिल्यांदा हा चित्रपट नाकारण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपटासाठी पंधरा जणांची समिती स्थापन केली. अभिनेत्री विद्या बालनही त्या समितीत होत्या.  सर्वानी चित्रपट पाहिला आणि अखेर तो संमत  झाला. चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले असून आता तो येत्या २७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

आज सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरीही न्यूड मॉडेलिंग हे वेगळे आणि धाडसी क्षेत्र आहे. त्यांचे हे काम चार भिंतींच्या बाहेर कोणालाही माहिती नसते. ‘न्यूड’ चित्रपटातून अशाच कणखर आणि धाडसी स्वभावाच्या स्त्रीची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न रवी जाधव यांनी केला आहे. ‘न्यूड’ हा आई आणि मुलाच्या नात्याचा चित्रपट आहे. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आई मनावर दगड ठेवून काय करू शकते याची प्रेरणादायी गाथा या चित्रपटातून सादर करण्यात आली आहे. वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच दाद आणि साथ दिली आहे. ‘न्यूड’ चित्रपटालाही तशीच साथ मिळेल आणि चित्रपट पाहून महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलेल, असा विश्वास रवी जाधव यांना वाटतो.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या  (एनएसडी) पदवीधर असलेल्या कल्याणी मुळे यांच्या ‘अनसिन’ नाटकाचे एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेले समीक्षण रवी जाधव यांनी वाचले होते. ‘एनएसडी’मध्ये त्यांनी केलेले काम रवी जाधव यांनी पाहिले आणि त्यांनी ‘यमुना’च्या भूमिकेसाठी  त्यांना विचारणा केली. वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका असल्याने कल्याणी यांनीही ही भूमिका करण्यास होकार दिला. भूमिकेचा अभ्यास म्हणून या विषयावरील पुस्तके वाचली, माहितीपट, लघूपट पाहिले, जे. जे. कला महाविद्यालयातील त्या दोन न्यूड मॉडेल्सशी चर्चा केली आणि त्यांनी ‘यमुना’ साकारली. ‘न्यूड’ चित्रपट हा निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार या सर्वाचा एक लढा आहे. चित्रपटाने एक वेगळा अनुभव आणि काम करण्याचे समाधान कल्याणी यांना मिळाले. चित्रपटाविषयी लोकांच्या मनात ज्या काही शंका-कुशंका आहेत त्याचे आता निराकरण होणार आहे. हा दर्जेदार आणि कलात्मकतेने केलेला चित्रपट असल्याचे कल्याणी मुळे यांना वाटते.

या चित्रपटात ‘चंद्राक्का’ची भूमिका अभिनेत्री छाया कदम करत आहेत. आयुष्यात अनेक चांगले-वाईट अनुभव या ‘चंद्राक्का’नी घेतले आहेत. आजच्या जगात वावरताना ‘अरे ला कारे’ करूनच जगावे लागते हे अनुभवातून आलेले शहाणपण ‘चंद्राक्का’ला आहे. ‘चंद्राक्का’ न्यूड मॉडेलिंग करणारी असून सुरुवातीला हे काम ती अनिच्छेने करत असते, पण एका क्षणी त्या विद्यार्थ्यांसाठी आपण देव आहोत आणि बाहेरच्या जगापेक्षा महाविद्यालयात सुरक्षित आहोत, याची जाणीव तिला होते. छाया कदम यांनी ‘फॅण्ड्री’ चित्रपटात ‘जब्या’च्या आईची भूमिका केली होती. ती भूमिका पाहून रवी जाधव यांनी ‘चंद्राक्का’च्या भूमिकेसाठी त्यांना विचारले आणि एक आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी  मिळाल्यामुळे छाया यांनी भूमिका स्वीकारली. हा चित्रपट म्हणजे स्त्रीशक्तीचा आविष्कार आहे. घराबाहेर पडल्यानंतर तिच्याबाबतीत जे काही घडते त्याला ती धाडसाने तोंड देते. चित्रपटाने एक वेगळा अनुभव दिल्याचे छाया कदम सांगतात.

First Published on April 22, 2018 3:22 am

Web Title: nude marathi movie