‘सोनु की टिटू की स्वीटी’ या चित्रपटातून नावारुपाला आलेली नुसरत भारुचा हे नाव आता बॉलिवूडला परिचयाचं झालं आहे. या चित्रपटामुळे तिच्या करिअरचा आलेख चांगलाच उंचावला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे तिला आणखी दोन नव्या चित्रपटांची ऑफर मिळाल्याचं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये नुसरतने तिच्या करिअरमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलाविषयी चर्चा केली. याविषयी बोलताना ‘सोनु की टिटू की स्वीटी’ या चित्रपटामुळे आपल्या करिअरला नवी कलाटणी मिळाल्याचं तिने सांगितलं.

“सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटामुळे मला नवी ओळख मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर माझ्या पदरामध्ये ‘तुर्रम खान’ आणि ‘ड्रिमगर्ल’ हे दोन नवे चित्रपट पडले. विशेष म्हणजे यापूर्वी मी वर्षाकाठी एक चित्रपट करत होते. मात्र आता माझ्याकडे एका वर्षामध्ये किमान दोन चित्रपट तरी असतात. या चित्रपटांच्यानिमित्ताने मला राजकुमार राव आणि आयुष्मान खुराणा या सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली”, असं नुसरतने यावेळी सांगितलं.

पुढे ती म्हणते, “सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटामध्ये मी नकारात्मक भूमिका केली होती. मात्र माझ्या या भूमिकेवरही प्रेक्षकांनी तितकंच प्रेम केलं. त्यामुळेच आज माझ्या वाट्याला दोन नवे चित्रपट आले आहेत”. या कार्यक्रमामध्ये तिने अन्य काही आठवणी आणि अनुभवही शेअर केलं. ‘सोनू की टिटू की स्वीटी’च्या प्रदर्शनानंतर माझ्या चाहत्यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं असं तिने सांगितलं. सोबतच तिला प्रवासादरम्यान विमानात आलेला अनुभवही तिने यावेळी शेअर केला.

दरम्यान, नुसरत लवकरच ‘ड्रिमगर्ल’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाची निर्मिती सलमान खान करत आहे.राज शांडिल्य ‘ड्रिमगर्ल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटात एका लहानशा गावातील प्रेमकथा दाखवली जाणार आहे.