01 December 2020

News Flash

नाटय़रंग : ‘ओ वूमनिया’ कोलाज : बदलत्या स्त्रीरूपांचा!

एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कोणतंच स्थान नव्हतं. हळूहळू काळ बदलला. कालौघात अनेक स्थित्यंतरंही झाली.

एकेकाळी स्त्रीला स्वत:चं नाव नव्हतं. गावही नव्हतंच. जिथं तिचा जन्म व्हायचा त्या गावची म्हणून आणि आई-वडिलांनी दिलेल्या नावानंच तिला ओळखलं जाई. लग्नानंतर आधीची तिची ही ओळख पुसून पतीच्या नव्या नाव-गावासह तिला नवी ओळख मिळे. या सगळ्यात तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कोणतंच स्थान नव्हतं. हळूहळू काळ बदलला. कालौघात अनेक स्थित्यंतरंही झाली. परिस्थितीवश का होईना, स्त्रीला घराबाहेर पडून स्वकमाईचा मार्ग पत्करावा लागला. परंतु तरीही तिला तिचं मत मांडण्याचं, त्यानुसार वागण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच. वडील वा पतीच्या हाती महिन्याकाठी आलेला पगार सोपवला की ते काय ते बघतील, या तिच्या दृष्टिकोनामुळे कमावती होऊनही तिला तिचं असं स्वतंत्र अस्तित्व लाभलं नाहीच. तरीही अर्थात एक गोष्ट यानिमित्तानं घडली. तिला आपल्या सामर्थ्यांची पुसटशी जाणीव झाली. त्यापुढला टप्पा म्हणजे घर आणि बाहेरचं कार्यक्षेत्र एकाच वेळी लीलया सांभाळण्याची तिनं केलेली कसरत. त्यात ती यशस्वीही झाली. तरीही तिच्या प्राधान्यक्रमांत घर-संसार हेच नित्य अग्रस्थानी राहिलं. एव्हाना संयुक्त कुटुंबपद्धती ढासळायला सुरुवात झाली होती. विभक्त कुटुंबात तिला आपलं म्हणणं मांडण्याचा थोडासा अधिकार प्राप्त झाला. त्याबरोबरीनं तिची फरपटही वाढली. ‘सुपर वुमन’ म्हणून तिला एकीकडे स्वत:चा अभिमान वाटू लागला तरी त्यापायी होणारी शारीरिक, मानसिक आणि भावनिक कुतरओढ भयंकर होती. स्त्रीच्या वृत्ती-प्रवृत्तीमध्ये काळानुरूप हे बदल होत गेले तरी पुरुषी मानसिकता मात्र त्या वेगानं काही बदलली नाही. किंबहुना, पुरुष बहुतांशी स्थितीवादीच राहिले. त्यामुळे स्त्रीची आणखीनच परवड झाली. बरं, आता गतिमान झालेलं विकासचक्र मागे घेणंही शक्य नव्हतं. न बदलणाऱ्या पुरुषी मानसिकतेशी जुळवून घेत मग ती पुढे पुढे जात राहिली.
जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर मात्र हे चित्र आमूलाग्रपणे बदललं. पुरुषाच्या बरोबरीनंच नव्हे, तर प्रसंगी त्याला मागे टाकून स्त्री वेगानं पुढे गेली. आता तिला रोखणं कुणालाच शक्य नव्हतं. तिला तिची मतं आली. स्वत्वाचं भान आलं. प्रत्येक बाबतीत तिला ‘स्व’ महत्त्वाचा वाटू लागला. घर आणि करीअर यांचा समतोल राखण्याची कसरत सोडून देऊन तिचं करीअर तिच्या लेखी अधिक महत्त्वाचं होऊ लागलं. त्यासाठी सगळ्या गोष्टी ‘मॅनेज’ करण्याची तिची कुवतही वाढत गेली. जी स्त्री एकेकाळी पुरुषाशिवाय आपल्या अस्तित्वाची कल्पनाही करू शकत नव्हती ती आता त्याच्याशिवायही मातृत्व प्राप्त करून घेण्याच्या गोष्टी करू लागली. नव्हे, तिनं ते प्राप्तही केलं. एकाच वेळी असंख्य गोष्टी सहजगत्या ‘मॅनेज’ करणं तिला जमू लागलं. आणि ती ‘इव्हेन्ट मॅनेजर’ बनली. स्वत:ला फारशी तोशीष लागू न देता सर्व काही ‘घडवून’ आणण्याची ताकद ती बाळगू लागली. आणि तिला कुणाचीच गरज उरली नाही. तिची ती स्वतंत्र झाली.
तिचा हा सर्व प्रवास नाटककार शेखर ढवळीकर यांनी ‘ओ वूमनिया’ या नाटकात रेखाटला आहे. या नाटकात त्यांनी नवीन काही मांडलं आहे अशातला भाग नाही. फक्त स्त्रीचा हा प्रवास त्यांनी संकल्पनांच्या महिरपीत यात बसवलाय, इतकंच. अस्तिवहीन स्त्री ते ‘स्व’चं नको इतकं भान आलेली स्त्री- एवढा व्यापक पैस लेखकानं नाटकात मांडला आहे. स्त्रीरूपांचा नितांतसुंदर कोलाज त्यांनी चितारला आहे. त्यात संयुक्त कुटुंबातील स्त्रीच्या घुसमटीपासून तिच्या कोंडलेल्या भावभावनांचा निचरा होण्यासाठी योजलेल्या निरनिराळ्या सण-व्रतवैकल्यांत खेळल्या जाणाऱ्या खेळांचा परामर्शही त्यांनी घेतला आहे. यानंतर नोकरीधंद्यासाठी बाहेर पडलेल्या स्त्रीला आलेलं स्वत्वाचं भान आणि घर व नोकरी यांच्यातील तोल सांभाळताना ‘सुपर वुमन सिंड्रोम’ला तिनं बळी पडणं- हा पट येतो. पुढल्या काळात तिची कार्यक्षेत्रं विस्तारत गेली आणि तिची दृष्टीही अधिकाधिक व्यापक होत गेली. आपल्या सामर्थ्यांची जाणवलेली ताकद ती आता वापरू लागली. त्यासाठी प्रचलित जीवनमूल्यं वाकवायला आणि प्रसंगी ती धुडकावून लावायलाही ती मागेपुढे पाहिनाशी झाली. स्व-मूल्यांवर जगणं पत्करल्यावर त्याची किंमत मोजायची तिची तयारी होती. ती मोजून आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मोठय़ा अभिमानानं मिरवण्यात ती धन्यता मानू लागली. स्त्रीची ही वाटचाल लेखक शेखर ढवळीकर यांनी ‘ओ वूमनिया’मध्ये निरनिराळ्या घटना-प्रसंगांतून अधोरेखित केली आहे. मात्र, हे करत असताना त्यांनी निवेदक हे पात्र नको इतकं वापरलं आहे, ही गोष्ट चांगलीच खटकते. प्रत्येक पात्राच्या मार्मिक भाष्यवजा निवेदनानंतर पुढील प्रसंग सादर करण्याची ही क्लृप्ती नाटकाचं नाटकपण पातळ करतं. अन्यथा स्त्रीच्या जगण्याचा एक नाटय़पूर्ण आलेख ‘ओ वूमनिया’मधून झळझळीतपणे सामोरा आला असता.
दिग्दर्शक मंगेश कदम यांनी ही बदलती स्त्रीरूपं ठसठशीतपणे प्रयोगातून मंचित होतील असं पाहिलं आहे. निवेदकांच्या भाष्यवजा विश्लेषणातून स्त्रीच्या बदलत्या रूपांकडे खेळकर दृष्टिकोनातून पाहण्याचा एक कोन (अॅंगल) नाटकात बुद्धय़ाच दिल्यासारखा वाटतो. या निवेदनांवर दिग्दर्शकानं कात्री चालवणं अपेक्षित होतं. परंतु मंगेश कदम यांच्यासारख्या चिकित्सक दिग्दर्शकानं ते का टाळलं, कळत नाही. कदाचित घटना-प्रसंगांतील सांधेजोड त्याविना शक्य होणार नाही असं त्यांना वाटलं असावं. किंवा मग पात्रांच्या वेशभूषेतील बदलास पुरेसा अवधी मिळावा हीसुद्धा सोय त्यात पाहिली गेली असावी. परंतु ही निवेदनं अनाठायी वाटतात, हे नक्की. ‘ओ वूमनिया’मधील विविध घटना-प्रसंगांतील बारकावे अत्यंत खुबीनं दिग्दर्शकानं अधोरेखित केले आहेत. नेत्रकटाक्षापासून देहबोलीपर्यंत आणि उच्चारित शब्दांच्या वजनापासून त्यातून ध्वनित होणाऱ्या अर्थापर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केल्याचं प्रकर्षांनं जाणवतं.
प्रदीप मुळ्ये यांनी योजलेलं लवचीक नेपथ्य विविध नाटय़स्थळं यथार्थपणे सूचित करतं. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून घटना-प्रसंगांतलं ‘नाटय़’ गहिरं केलं आहे. अजीत परब यांच्या पाश्र्वसंगीतातून नाटय़ात्मकतेस उठाव मिळतो. चैत्राली राजे यांनी पात्रांना दिलेली प्रसंगानुरूप वेशभूषा आपली कामगिरी चोख बजावते.
यातले सारेच कलाकार कसलेले असल्यानं त्यांनी बदलत्या स्त्रीरूपांचा हा कोलाज विलक्षण ताकदीनं साकारला आहे. सुहास जोशी यांनी रंगविलेली विविध घटना-प्रसंगांमधील पात्रं त्या- त्या पात्राच्या व्यक्तिमत्त्वातील सूक्ष्म भेदांनिशी समूर्त केली आहेत. अजूनही त्यांच्या अभिनयातील चार्म कायम आहे. वयपरत्वे आणि अनुभवसंपन्नतेनं त्यात आणखीनच खुमारी आली आहे. स्वाती चिटणीस यांनी कमालीची सोशीक, तक्रारखोर, संसाराच्या ओझ्यानं वाकलेली स्त्री ते घर आणि नोकरीधंद्यात सहजी संचार करणारी ‘सुपर वुमन’- या स्त्रीच्या वाटचालीतले निरनिराळे टप्पे आणि त्यांतली घालमेल, कल्लोळ, फरपट वास्तवदर्शी केली आहे. कादंबरी कदम या आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्रीनं स्त्रीच्या या प्रदीर्घ प्रवासातील विकसनाच्या खुणा दाखविणारी स्त्रीरूपं अत्यंत तडफेनं वठविली आहेत. काळाबरोबर चालणारी आणि त्याच्याशी समांतर विचार करणारी व तो प्रत्यक्षात कृतीत आणताना जराही न बिचकणारी आजची स्त्री त्यांनी बिनधास्त उभी केली आहे. त्यांचं आत्मविश्वासपूर्ण उत्फुल्ल व्यक्तिमत्त्व त्यांना याकामी साहाय्यभूत ठरलं आहे. सतीश पुळेकरांचं बऱ्याच खंडानंतर रंगभूमीवर झालेलं पुनरागमन सुखद आहे. त्यांचा रंगमंचीय सहज वावर लोभस वाटतो. जयंत सावरकर या वयातही तरुणांना लाजवील अशा सफाईनं आपली भूमिका निभावतात. आशुतोष गोखलेंना मात्र कमी वाव मिळाला आहे. तरी त्यातही ते छाप पाडतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:35 am

Web Title: o womaniya marathi drama review by ravindra parthe
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ‘मदारी’चा खेळ
2 श्रीदेवीच्या गाण्यांवर माधुरीचा नाच!
3 चित्ररंग : कोहमपर्यंत नेणारा प्रवास
Just Now!
X