News Flash

‘पोस्टरवरचे बॉइज’ चित्रपटाचे निमित्त!

एका गावात लागलेल्या ‘त्या’ पोस्टरवरून तीन तरुणांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडते. त्या घटनेत दिग्दर्शकाला चित्रपट सापडतो.

| June 14, 2014 06:41 am

एका गावात लागलेल्या ‘त्या’ पोस्टरवरून तीन तरुणांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडते. त्या घटनेत दिग्दर्शकाला चित्रपट सापडतो. तो त्यावर काम करतो आणि तयार होतो एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट. श्रेयस तळपदेची निर्मिती असलेल्या ‘पोस्टर बॉइज’या चित्रपटाच्या निर्मितीमागची कथा ही अशी आहे. अभिनेते समीर पाटील यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटासाठी ‘पोस्टरवरचे बॉइज’ खरोखरच निमित्त ठरले.
चित्रपटासाठी निमित्त ठरलेल्या त्या पोस्टरवरच्या बॉइजविषयी माहिती देताना समीर पाटील यांनी सांगितले, २००९ च्या निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिनीसाठी मी त्यांच्या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून काम करत होतो. एका गावात चित्रीकरण संपवून हॉटेलवर परतल्यानंतर वृत्तवाहिनीवर बातम्यांमध्ये ‘ती’ बातमी पाहिली. एका गावातील तीन तरुणांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या नकळत त्यांची छायाचित्रे काढून ती नसबंदीच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली असतात. त्या तरुणांच्या छायाचित्रांचा वापर करून त्याचे पोस्टरही गावात लावले जाते.
पोस्टरवरून त्या तरुणांच्या वैयक्तिक आयुष्यात, नातेवाईकात आणि समाजात मोठी खळबळ उडते. त्या एका पोस्टरमुळे त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते, असा आशय त्या बातमीचा होता.  
चित्रपटासाठी या विषयात भरपूर नाटय़ होते. मी त्यावर कथा लिहिली. पटकथेसाठी माझा मित्र चारुदत्त भागवत याचे सहकार्य मिळाले. श्रेयस तळपदे आणि मी यापूर्वी एकत्र काम केले असल्याने त्याच्याशी परिचय होता.
एकदा सहज गप्पा मारताना ‘सनई चौघडे’नंतर मी नवीन मराठी चित्रपट करतोय, असे श्रेयसने मला सांगितले होते. माझ्याकडचा हा विषय त्याला सांगितल्यानंतर त्यालाही तो आवडला. त्याने त्याच्या दुसऱ्या मराठी चित्रपट निर्मितीसाठी हा विषय निवडला आणि आमचा ‘पोस्टर बॉइज’ तयार झाल्याचे पाटील म्हणाले. ऋषीकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 6:41 am

Web Title: occassion of poster boys
Next Stories
1 भूमिकांची अदलाबदल कलाकारांच्या पथ्यावर!
2 पाहाः ‘हॅपी जर्नी’चा ट्रेलर
3 वॉरियर रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय
Just Now!
X