इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १९४८ मध्ये हॉकी या खेळातील भारताच्या विजयासंदर्भात या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे कथेत वास्तविकता यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. १९४८ मध्ये भारताने हॉकी या खेळात ज्या स्टेडियमवर विजय नोंदवला, त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली. ऑडसल स्टेडियमवरील त्या ऐतिहासिक विजयाचं चित्रीकरण करण्यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आली.

१९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं. हीच कहाणी ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘गोल्ड’च्या ट्रेलर आणि गाण्यांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Video : ऐश्वर्याचं नाव घेताच सलमानचा चेहरा पाहण्याजोगा

भारतीय हॉकी संघाच्या या सुवर्ण कामगिरीचे क्षण चित्रीत करण्यासाठी तब्बल दोन हजार कलाकारांचा फौजफाटा जमवण्यात आला होता. यामध्ये भारतीयांसोबतच ब्रिटिश ज्युनियर आर्टिस्टनाही घेण्यात आले होते.

खेळाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची किनार असणारं कथानक ‘गोल्ड’ या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. यामध्ये अक्षय तपन दास ही भूमिका साकारत आहे. स्वतंत्र भारतासाठी हॉकी खेळण्याचा स्वप्न पाहणारा तपन दास हॉकी टीमचा सहाय्यक व्यवस्थापक असतो. रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. अक्षय कुमारसोबतच यामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.